पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर पुण्यातील ठोसर पागा याठिकाणी आज दुपारी महानुभाव पंथानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
शेकडो अनाथ, निराधार जीवांना आपल्या मायेच्या पदराखाली घेत आधार देणाऱ्या आणि त्यांची ‘माय’ झालेल्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ (७४) यांचे मंगळवारी रात्री 8 वाजून दहा मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील ठोसर पागा येथे आज, बुधवारी दुपारी 12 वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर महानुभाव पंथीयांच्या प्रथेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे कन्या ममता, नातेवाईक सुरेश वैराळकर यांच्यासह मोठा परिवार आहे.
सिंधुताई गेल्या दीड महिन्यापासून गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, उपचार सुरू असतानाच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले.
पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली
सिंधुताई सपकाळ यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे. सिंधुताईंचे समाजसेवेत योगदान खूप मोठे आहे. त्यासाठी त्या सदैव स्मरणात राहतील. अनेक अनाथ मुलांच्या त्या आधार बनल्या, त्यांना सन्मान दाखवला. त्यांच्यामुळे हजारो मुले चांगले, दर्जेदार जीवन जगत आहेत. उपेक्षित समाजासाठीही त्यांनी भरीव कार्य केले. त्यांच्या निधनाने व्यक्तिशः मला अतीव दुःख झाले आहे. त्यांचे कुटुंबीय, हितचिंतक यांच्या दुःखात मी सहभागी आहे ओम शांती’ असे मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
त्याशिवाय महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. रोहित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सिंधुताईंच्या निधनावर दुःख व्यक्त केले
Recent Comments