Kalaburgi

पत्रकारांनी अंतःकरणपूर्वक काम केल्यास सकारात्मक बदल : मुख्यमंत्री

Share

कर्नाटक राज्य श्रमिक पत्रकार संघाच्या ३६ व्या संमेलनाचे आणि पत्रकार भवनाच्या पहिल्या मजल्याचे उदघाटन आज कलबुर्गी येथे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते पार पडले.

कलबुर्गी येथील अप्पनकेरे स्मृती सभागृहात आज, मंगळवारी राज्य श्रमिक पत्रकार संघाचे ३६वे संमेलन पार पडले. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या संमेलनाचे तसेच पत्रकार भवनाच्या पहिल्या मजल्याचे उदघाटन केले. संघाचे राज्याध्यक्ष शिवानंद तगडूर अध्यक्षस्थानी होते. श्री शरण बसवेश्वर संस्थांचे ८ वे पिठाधिपती डॉ. शरणबसवप्पा अप्पा यांच्या सानिध्यात झालेल्या या कार्यक्रमात तगडूर यांनी मान्यवरांचा सत्कार केला.

त्यानंतर संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करून बोलताना मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यसंग्रामात वर्तमानपत्रे आणि पत्रकारांची भूमिका अनन्य साधारण आहे. हस्तलिखितांद्वारे सुरु केलेल्या या मूल्याधारित व्यवसायात आजही मूल्ये, नैतिकता, सामाजिक बांधिलकी टिकून आहे हे महत्वाचे आहे. पत्रकारांनी अंतःकरणपूर्वक समाजाच्या हितासाठी कार्यरत राहिल्यास समाजात अनेक सकारात्मक बदल घडून येतील. राजकारणी आणि पत्रकारांचा संबंध अतूट आहे. ते टिकवून ठेवुयात. पत्रकारांनी आपल्यात एकी ठेवणे खूप गरजेचे आहे असे बोम्मई यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा,खा. डॉ. उमेश जाधव, राज्याचे उद्योगमंत्री मुरुगेश निराणी, आ. दत्तात्रय रेवूर, अजेयसिंग धर्मसिंग, सुभाष गुत्तेदार, वन महामंडळाच्या अध्यक्षा तारा अनुराधा, राज्य पत्रकार संघाचे उपाध्यक्ष पुंडलिक बाळोजी, मत्तिकेरी जयराम, सरचिटणीस जी. सी. लोकेश, संजीव कुलकर्णी, बंगले मल्लिकार्जुन, डॉ. के. उमेश्वर आणि कलबुर्गी पत्रकार संघाचे अध्यक्ष भवानी ठाकूर आदी उपस्थित होते.

 

 

 

Tags: