Belagavi

देशात ओमीक्रॉन रुग्णांची संख्या 1000 पार; पुण्यात ओमीक्रॉनचा देशातील पहिला मृत्यू

Share

देशात कोरोनाच्या ओमीक्रॉनबाधित रुग्णाचा पहिला मृत्यू पुण्यात नोंदवण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ५२ वर्षीय कोविड रुग्णाचा २८ डिसेंबरला हृदयविकाराने मृत्यू झाला होता. गुरुवारी त्याचा अहवाल ओमीक्रॉन पॉझिटिव्ह आला. त्याने नायजेरियाचा प्रवास केला होता. त्याला १३ वर्षांपासून मधुमेह होता. त्याचा मृत्यू कोरोनासह इतर नॉन कोविड कारणांनी झाल्याची माहिती साथरोग विभागाने दिली. भारतासह ६ देशांत ओमीक्रॉनचे ६२ मृत्यू झाले आहेत. गुरुवारी देशात ओमीक्रॉन रुग्णांची संख्या ११९१ झाली. महाराष्ट्रात गुरुवारी ओमीक्रॉनचे १९८, तर एकट्या मुंबईतच १९० रुग्ण सापडले. यापैकी १५३ जणांचा परदेश प्रवासाचा इतिहास नाही. राज्यातील एकूण रुग्णसंख्या ४५० वर गेली आहे. नाशकातही ओमीक्रॉनचा पहिला रुग्ण आढळला. राज्यात कोरोनाचे ५,३६८ नवे रुग्ण, तर २२ मृत्यूची नोंद झाली. राज्यात तिसरी लाट आल्याचे बिहार सरकारनेही मान्य केले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव लव अग्रवाल म्हणाले, महाराष्ट्र, केरळ, प. बंगाल, तामिळनाडू, दिल्ली व गुजरातेत स्थिती जास्त गंभीर आहे.

महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यानुसार, मुंबईत पॉझिटिव्हिटी दर ४% आहे. तो ५% झाला तर लॉकडाऊन लागू करावा लागू शकतो.

धार्मिक, राजकीय सभासंमेलनासाठी ५० तर अंत्यविधीसाठी केवळ २० जणांना परवानगी

झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना रुग्णांमुळे ३१ डिसेंबरपासून राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नव्या नियमावलीनुसार लग्नसोहळे, सभा, संमेलनांसाठी केवळ ५० व्यक्तींची मर्यादा राहणार असून अंत्यसंस्कारासाठी केवळ २० जणांची मर्यादा ठेवण्यात आली आहे. सायंकाळी टास्क फोर्सची बैठक झाली. या बैठकीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे उपस्थित होते. त्यानंतर रात्री उशिरा मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती यांनी नवी नियमावली जाहीर केली.

Tags: