जितक्या लवकर प्रत्येकजण लस घेईल तितक्या लवकर संभाव्य कोविड तिसऱ्या लाटेला समर्थपणे तोंड देण्यास सक्षम होईल. लसीकरणासंदर्भात कोणतीही शंका किंवा भीती बाळगण्याची गरज नसल्याचे मत आरसीएचओ डॉ. ईश्वर गडाद यांनी व्यक्त केले आहे.
बेळगाव सुवर्णसौध येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. ईश्वर गडाद म्हणाले, ३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील सर्व मुलांना कोविड लसीकरण देण्यात येणार आहे. कोविड लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र-राज्य सरकारच्या परवानगीनुसार विद्यार्थ्यांना शाळेतदेखील लस देण्याची तयारी जिल्ह्यात करण्यात आली असून जनतेत लसीकरणासंदर्भात जागृती करण्याच्या हेतूने हे अभियान हाती घेण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
हुक्केरी तालुका वैद्याधिकारी डॉ. उदय कुडची बोलताना म्हणाले, हुक्केरी तालुक्यात आतापर्यंत ३ लाखाहून अधिक जनतेचे लसीकरण पूर्ण झाले असून हुक्केरी तालुका लसीकरणात पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या लसीकरणात ८५ टक्के जनतेचे लसीकरण झाले आहे. जिल्हा प्रशासन, आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागासह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने लसीकरण अभियान यशस्वीरीत्या पार पाडण्यात येत असल्याचे डॉ. कुडची म्हणाले.
३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला प्रारंभ होत असून या पार्श्वभूमीवर राज्यभरात जिल्हा प्रशासन आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्यावतीने लसीकरण आयोजित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व पालकांनी आपल्या मुलांच्या लसीकरणासाठी निःसंकोचपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
Recent Comments