Athani

अथणीत भाजप तोंडावर आपटला; १५ जागांसह काँग्रेसला स्पष्ट बहुमत

Share

 माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, . महेश कुमठळ्ळी यांच्यासारखे मातब्बर नेते असूनही अथणी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप तोंडावर आपटला आहे. १५ जागांसह काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.

होय, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आ. महेश कुमठळ्ळी यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अथणी नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप तोंडावर आपटला आहे. गुरुवारी जाहीर झालेल्या निकालात एकूण २७ जागांपैकी काँग्रेसने १५ जागा मिळवत निर्विवाद बहुमत मिळवले.  भाजपला केवळ ९ प्रभाग राखता आले. ३ प्रभागांत अपक्षांनी विजय मिळवला आहे. नगर पंचायत हातची गेल्याने भाजपच्या गोटात स्मशानशांतता पसरली आहे तर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आनंदाला पारावार राहिलेला नाही. निकाल जाहीर होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, गुलाल उधळत विजयाचा जल्लोष साजरा केला.

काँग्रेसच्या विजयावर समाधानाची प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते गजानन मंगसुळी म्हणाले, २७ पैकी १५ प्रभागात काँग्रेस उमेदवा विजयी झाले आहेत. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आ. महेश कुमठळ्ळी यांच्यासारखे मातब्बर नेते असूनही लोकांनी काँग्रेसला बहुमत दिले आहे. कार्यकर्त्यांचे श्रम आला कारणीभूत आहेत. या जनादेशाला मान देऊन पंचायतीतर्फे लोकल्याणाची कामे करण्यात येतील असे मंगसुळी यांनी सांगितले.

निकालावर प्रतिक्रिया येताना माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचे पुत्र व भाजप युवा नेते चिदानंद सवदी म्हणाले, आम्हाला अपेक्षेइतक्या जागा जिंकता आलेल्या नाहीत. बेळगावात विधिमंडळ अधिवेशन सुरु असताना ही निवडणूक झाली. त्यावेळी माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आ. महेश कुमठळ्ळी यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी चांगला प्रचार केला होता. त्यामुळे ९ जागांवर विजय मिळाला आहे. हा जनादेश स्वीकारून पुढील काळात चांगली विकासकामे करून जनतेच्या हृदयात स्थान निर्माण करू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

एकंदर, राज्यात, केंद्रात सत्ता असून आणि अथणी तालुक्यातही एक एमएलसी, एक विध्यमं आमदार असूनही अथणी नगर पंचायतीवर भाजपचा दारूण पराभव झाला आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

 

Tags: