ओमीक्रॉनच्या रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कर्नाटकात सरकारने पुढील १० दिवस नाईट कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे न्यू इयर सेलेब्रेशनवरही निर्बंध आले आहेत.
कोरोनाच्या ओमीक्रॉन या नव्या विषाणूने बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने राज्यात २८ डिसेंबरपासून रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. विधानसौधमध्ये मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नाईट कर्फ्यू जारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर, महसूल मंत्री आर. अशोक, गृहमंत्री आरग ज्ञानेंद्र, मुख्य सचिव पी. रवीकुमार उपस्थित होते.
या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती देताना आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर म्हणाले, राज्यात २८ डिसेंबरपासून रात्री १० ते सकाळी ५ या वेळेत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. सार्वजनिक ठिकाणी न्यू इयर सेलिब्रेशनवर बंदी घालण्यात आली आहे. हॉटेल, पब, रेस्टॉरंट या ठिकाणी केवळ ५०% उपस्थितीची परवानगी दिली आहे. राज्यात ९०% लोकांचे पहिल्या डोसचे आणि ७५% लोकांचे दुसऱ्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले आहे. राज्यात ओमीक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असून, तिच्यावर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात आजवर ओमीक्रॉनचे ३८ रुग्ण आढळले आहेत. दुसरा डोस घेतल्याने रोगप्रतिकारक शक्तीत वाढ होते. त्यामुळे ज्यांनी अद्याप दुसरा डोस घेतला नाही त्यांनी तो घ्यावा. यात दुर्लक्ष करू नये असे आवाहन मंत्री सुधाकर यांनी केले.
ओमीक्रॉनच्या वाढत्या धोक्यामुळे राज्यात सार्वजनिक ठिकाणी न्यू इयर सेलिब्रेशन करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
Recent Comments