Belagavi

देव पाण्यात घालून बसलेल्या इच्छुकांना खुशखबर; महापौर-उपमहापौर निवडणूक ११ जानेवारीला ?

Share

बरेच महिने प्रलंबित राहिलेल्या बेळगाव मनपाच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीचा मुहूर्त अखेर जवळ आला आहे. नवीन वर्षात जानेवारीच्या ११ तारखेला ही निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

होय, राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका होऊन सुमारे ४ महिने लोटले आहेत. मात्र अद्याप महापौर-उपमहापौरांची निवड झालेली नाही. त्यामुळे या पदांचे इच्छुक नगरसेवक देव पाण्यात घालून बसले आहेत. बेळगावातही हीच परिस्थिती आहे. बेळगावात ५८ नगरसेवकांपैकी ३५ जागा जिंकत भाजपने मनपावर निर्विवाद बहुमत मिळवले आहे. राज्यात भाजपचेच सरकार असूनही अजून या नगरसेवकांचा शपथविधीही झाला नसल्याने त्यांच्यात अस्वस्थता पसरली आहे. मात्र आता त्यांची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे आहेत. येत्या ११ जानेवारी रोजी महापौर-उपमहापौर पदाची निवडणूक घेण्याची तयारी नगरप्रशासन विभागाने सुरु केली आहे. या दोन्ही पदांचे आरक्षणही सरकारने याआधीच एका परिपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. त्यानुसार महापौरपद सामान्य तर उपमहापौरपद सामान्य महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे या प्रवर्गातील इच्छुकांनी मोर्चेबांधणीही सुरु केली होती. मात्र निवडणुकीची तारीख लवकर जाहीर होत नसल्याने त्यांच्यात नाराजी पसरली होती. बेळगावातील उत्तर व दक्षिण मतदारसंघांपैकी दक्षिणमध्ये मराठा समाजाची संख्या जास्त आहे. तेथे जास्त भाजप नगरसेवकांना मराठी मतदारांनी निवडून दिले आहे. त्यामुळे महापौरपद मराठा समाजाला आणि उपमहापौरपद उत्तरमध्ये प्राबल्य असलेल्या लिंगायत समाजाला देण्याचा निर्णय भाजपने घेतला असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र अलीकडच्या काळात घडलेल्या महापुरुषांच्या विटंबनेच्या घटना आणि त्याचे उमटलेले पडसाद या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा फेरविचार करण्याचा आग्रह कानडी संघटनांनी भाजपला केल्याचे समजते. त्यामुळे भाजप त्याला बळी पडणार का हे पाहणे कुतूहलाचे ठरेल.

 

 

Tags: