Kagawad

कागवाडमध्ये नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजप उमेदवाराचा प्रचार

Share

कागवाडचे आमदार आणि माजी मंत्री श्रीमंत पाटील यांनी शेडबाळ, उगार, ऐनापूरमध्ये नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकीसाठी चिकोडी जिल्हा भाजप पक्षाचे अध्यक्ष आणि नेत्यांसमवेत भाजप उमेदवारांचा जोरदार प्रचार केला.

यावेळी आमदार श्रीमंत पाटील बोलताना म्हणाले, कागवाड तालुक्यातील तीन भागातील भाजप उमेदवारांना मतदारांनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवारांचा विजय निश्चित असून विरोधकांचे डिपॉझिट जप्त होईल, असा विश्वास आपल्याला आहे, असे मत श्रीमंत पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र एकीकरण समितीवरील बंदीबाबत प्रतिक्रिया विचारली असता श्रीमंत पाटील यांनी आपल्या राज्याबाबत सर्वांना अभिमान असणे गरजचे असून राज्यविरोधी कार्य करणाऱ्यांचा मी निषेध व्यक्त करतो, असे मत व्यक्त केले.

अथणी पीएलडी बँकेचे अध्यक्ष शीतलगौड पाटील यांनी आपले विचार व्यक्त करताना श्रीमंत पाटील यांच्या कार्याचा गौरव केला. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाच्या निधीतील रक्कम जशास तशी प्रामाणिकपणे खर्च करणारे आमदार असल्याचे ते म्हणाले.

यासह चिकोडी जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ. राजेश निराळी, उपाध्यक्ष विनायक बागडी, सचिव निंगाप्पा खोकले, आर. एम. पाटील, महादेव कोरे, शिवानंद गोलभावी, श्रीनिवास पाटील यांनी भाजपच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त केला.

यावेळी शांतीसागर आश्रमाचे व्यवस्थापक राजू नांद्रे, भरतेश पाटील, सचिन पाटील, उत्कर्ष पाटील, किरण यांडगौडर आदींसह उमेदवार, कार्यकर्ते उपस्थित होते. सुभाष ढाले यांनी शेडबाळ निवडणुकीसंदर्भात माहिती दिली. ऐनापुरे येथे झालेल्या सभेत दडगौड पाटील, तम्मण्णा पारशेट्टी, राजेंद्र पोतदार, रतन पाटील, आणि उगार येथे झालेल्या सभेत योगेश कुंभार, प्रफुल थोरुषे, अविनाश मोरे, सुजय फराकट्टे आदी उपस्थित होते.

Tags: