Belagavi

जनतेच्या हितासाठीच धर्मांतर बंदी कायदा : महसूल मंत्री आर. अशोक

Share

धर्मांतर बंदी कायद्यात केवळ काही सुधारणा आम्ही केल्या आहेत. जनतेच्या हिताच्या दृष्टीनेच हा कायदा सरकार आणत असल्याचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी सांगितले.

गुरुवारी सुवर्णसौधमध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री अशोक यांनी धर्मांतर बंदी कायद्याचे समर्थन केले. ते म्हणाले, दुटप्पीपणामुळे काँग्रेसचा देशात सर्वत्र उपहास होत आहे. राज्य, देश एकसंघ रहावा या साठी धर्मांतर बंदी कायदा लागू झाला पाहिजे. जे-जे ज्या-ज्या धर्मात आहेत, त्यांनी त्या-त्या धर्मात रहावे, आपली पूजा-उपासना सुरु ठेवावी. एका धर्मातून दुसऱ्या धर्मात जाणे चुकीचे आहे असे मंत्री अशोक यांनी सांगितले.

या कायद्याला विरोध करणारे कोण आहेत? ‘खाई त्याला खवखवे’ या म्हणीप्रमाणे काहीजण विरोध करत आहेत. तुमचे कोण धर्मांतर करत आहे का? जे विरोध करत आहेत त्यांना आम्ही कधीही आमच्या धर्मात या असे म्हटलेले नाही. आमचा धर्म टिकून रहावा, दुसरे धर्म टिकून रहावेत हेच भाजपचे धोरण आहे असे अशोक यांनी स्पष्ट केले.

सिद्दरामय्या यांना आम्ही सगळे साक्षी-पुरावे दाखवले. त्यावेळी ते भांबावून निघून गेले. काँग्रेस नेते रस्त्यावर एक आणि विधानसौधमध्ये एक बोलतात. त्यांचे धोरणच ते आहे असे मंत्री अशोक यांनी सांगितले.

एकंदर नव्या धर्मांतर बंदी कायद्याने कोणत्याही धर्माचे नुकसान होणार नाही अशी ग्वाही मंत्री आर. अशोक यांनी यावेळी दिली.

 

 

 

Tags: