Belagavi

सुवर्णसौधसमोर शारीरिक शिक्षकांचे अनोखे शिट्टी मारो आंदोलन !

Share

शाळेच्या मैदानात विध्यार्थ्यांना खेळ शिकविताना शारीरिक शिक्षक शिट्टी मारतात हे आपण सगळ्यांनीच अनुभवलंय. मात्र आपल्या मागण्यांसाठी शिट्टी मारून सरकारचे लक्ष वाढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

होय, बेळगावातील सुवर्णसौधमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णगार्डनमध्ये रोज वेगवेगळ्या संस्थांकडून निदर्शने, आंदोलने करण्यात येत आहेत. त्यात बुधवारी राज्यभर्तून आलेल्या शारीरिक शिक्षक उमेदवारांनी अनोखे शिट्टी मारो आंदोलन केले. एकतर आम्हाला नोकऱ्या द्या अन्यथा विष पिऊन मरण्याची परवानगी द्या असा टाहो त्यांनी फोडला.

यावेळी बोलताना बळ्ळारीहुन आलेल्या व्यंकटेश यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षांपासून शारीरिक शिक्षकांच्या नेमणूक केलेल्या नाहीत. आमची वयोमर्यादाही संपत चालली आहे. सीपीएड, बीपीएड, एमपीएड केलेले अनेक उमेदवार यामुळे संकटात सापडले आहेत. विष पिऊन जीव देण्याची वेळ आमच्यावर आली आहे. सरकारने प्राथमिक ते पदवीच्या वर्गापर्यंत शारीरिक शिक्षकांच्या नियुक्त्या कराव्यात अन्यथा आम्हाला विष पिऊन आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी. राज्यात भाजप, काँग्रेस, जेडीएसची सरकारे आली आणि गेली. आता भाजपचे सरकार आहे. किमान त्यांनी तरी आम्हाला रोजगार द्यावा अशी मागणी व्यंकटेश यांनी केली.

राज्यभरातून आलेल्या असंख्य शारीरिक शिक्षक उमेदवारांनी या शिट्टी मारो आंदोलनात भाग घेतला. सरकार त्यांच्या मागण्या मान्य करते का हे पहावे लागेल.

 

 

 

Tags: