Belagavi

होनगा येथे शिवपुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न; तिघे समाजकंटक ताब्यात

Share

 बेळगाव तालुक्यातील होनगा गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान करण्यास आलेल्या तिघा समाजकंटकांना गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

होनगा येथील बलभीम गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या चौथऱ्यावर चढून पुतळ्याची विटंबना करण्याच्या प्रयत्न तिघे युवक होते. याची माहिती मिळताच गावकरी तेथे मोठ्या संख्येने जमा झाले. त्यामुळे या समाजकंटकांना घाम फुटला. काहींनी काकती पोलिसांना याची माहिती दिली. हे युवक दारू प्याले होते. पोलिसांसमोर दारूच्या नशेत त्यांनी अश्लील शिवीगाळ केली. पोलिसांनी त्यांना पकडले.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या. आधीच महापुरुषांच्या अवमानाच्या घटना घडत असताना या समाजकंटकांनी होनगा या एरव्ही शांत गावात सामाजिक सौख्य बिघडवण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी पकडून काकती पोलीस ठाण्यात नेले. याची माहिती मिळताच काकती परिसरातील शिवप्रेमींनी पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. पोलिसांनी त्यांची समजूत घालून पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.

Tags: