Belagavi

विधिमंडळात काँग्रेस-भाजपमध्ये चांगलीच जुंपणार; शिवकुमारांचे संकेत

Share

धर्मांतर विरोधी कायद्याला आमचा आधीपासूनच विरोध आहे. हा कायदा घटनाविरोधी असल्याने सरकारने त्याचा मसुदा मांडल्यास त्याला आम्ही तीव्र विरोध करू असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सांगितले.

: बेळगावात मंगळवारी पत्रकार परिषदेत बोलताना शिवकुमार म्हणाले, जबरदस्तीने धर्मांतर न करण्याचा कायदा आधीपासूनच अस्तित्वात आहे. त्यामुळे धार्मिक, व्यक्तिस्वातंत्र्य कोणाला हिरावून घेता येणार नाही. बौद्ध, ख्रिस्ती यांच्यासह हा सर्व धर्मांशी संबंधित विषय आहे. इस्कॉन, अमृतानंदमयी आश्रमात अनेक परदेशी लोक येतात, हरे राम, हरे कृष्ण असे भजन गातात. त्यामुळे या सगळ्यांनाच हा कायदा लागू होणार आहे. कर्नाटक एक धर्मनिरपेक्ष राज्य, येथे सगळ्यांना जगण्याचा हक्क आहे म्हणून लोक आदराने पाहतात. पण सरकार नव्या कायद्याने येथील शांतता बिघडवू पहात आहेत. काही ख्रिस्तीना लक्ष्य करून बोलत आहेत असा आरोप शिवकुमार यांनी केला.

आता कुठे जबरदस्तीने धर्मांतर होते असा सवाल करून शिवकुमार म्हणाले, मोगलानी देश लुटला, पण कितीजण मुस्लिम झाले? आजही मुस्लिमांची संख्या शेकडा १०-१२ इतकीच आहे. हे हिंदू राष्ट्र आहे. उगाच येथे जबरदस्तीने धर्मांतर होत असल्याच्या वावड्या राजकीय हेतूने उठवल्या जात आहेत. दोघा प्रेमिकांची मने जुळली तर तो लव्ह जिहाद ठरतो का? हळद वेगळी असते अन तांदूळही, पण ते दोन्ही मिसळले तर मंत्राक्षता होतात असे त्यांनी सांगितले. काँग्रेस तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याच्या भाजप आणि जेडीएसच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना शिवकुमार म्हणाले, कोण्या एका गुंडाने महापुरुषांची विटंबना केली म्हणजे आम्ही साक्षी-पुरावे नसताना आरोप करणे चुकीचे आहे. ज्यांनी चूक केलीय त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. काँग्रेस कार्यकर्त्याने बेंगळुरात शिवपुतळ्याची विटंबना केल्याच्या आरोपावर शिवकुमार म्हणाले, राजकीय नेता म्हटल्यावर अनेकजण येतात, नेत्यांसोबत फोटो काढून घेतात. अशांनी कोठे दगडफेक केली, तो जनता दलाच्या नेत्यांसोबत फोटोत दिसला म्हणून जनता दलाने दगडफेक केली असे म्हणता येत नाही असा टोला हाणला.

एकंदर धर्मांतर बंदी कायद्यावरून विधिमंडळात काँग्रेस-भाजपमध्ये चांगलीच जुंपणार असल्याचे संकेत शिवकुमार यांनी दिले आहेत.

 

Tags: