चिकोडी जिल्ह्याची घोषणा होईपर्यंत आपण स्वस्थ बसणार नसून, स्वतंत्र चिकोडी जिल्ह्याच्या मागणीसाठी होत असलेल्या आंदोलकांसमवेत मरेपर्यंत मी सोबत राहीन, असे प्रतिपादन आमदार गणेश हुक्केरी यांनी केले आहे.

चिकोडी मिनी विधानसौध समोर स्वतंत्र चिकोडी जिल्ह्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान ते बोलत होते. यावेळी छेडण्यात आलेल्या धरणे आंदोलनाला भेट देऊन स्वतंत्र चिकोडी जिल्ह्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांचे निवेदन आमदार गणेश हुक्केरी यांनी स्वीकारले. यावेळी बोलताना ते म्हणाले, माजी खासदार आणि मी चिकोडी जिल्ह्याच्या मागणीसाठी अनेक प्रयत्न केले आहेत. या भागाचे मठाधीश आणि दिवंगत बी. आर. संगप्पगोळ यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन स्वतंत्र जिल्ह्याची मागणीही केली. परंतु शेवटी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा बारगळली. चिकोडी जिल्ह्याच्या मागणीसाठी माझे वडील प्रकाश हुक्केरी यांच्यासह अनेक कार्यालयांची भेट घेण्यात आली असून चिकोडी जिल्ह्यातील प्रत्येक गावात पदयात्रा करून, यासंदर्भात अधिवेशन संपण्याच्या आत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू, असे गणेश हुक्केरी म्हणाले.
यानंतर चिकोडी जिल्हा आंदोलन समितीचे अध्यक्ष काशिनाथ कुरणी म्हणाले कि, आमदार गणेश हुक्केरी यांनी अधिवेशनात चिकोडी जिल्ह्याच्या मागणीसाठी आवाज उठवावा. चिकोडी जिल्ह्याची घोषणा न झाल्यास उत्तर कर्नाटकात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
साहित्यिक एस. वाय. हांजी, नगरसेवक रामा माने, शाम रेवडे, चंद्रकांत हुक्केरी आदींची भाषणे झाली. यावेळी संजू बडिगेर, तुकाराम पाटील, साबीर जमादार, गुलाब हुसेन बागवान, इरफान बेपारी, मुद्दसर जमादार, फिरोजा कलावंत, गणेश मोहिते, सतीश कुलकर्णी, रवी हंपणावर, बसवराज ढाके, विजय पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments