Belagavi

समाजातील कटकारस्थाने करणाऱ्यांना तडीपार करावे : मंत्री एमटीबी नागराज

Share

छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांचा अवमान करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना तडीपार करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री एमटीबी नागराज यांनी दिली.

: बेळगावमधील अनगोळ परिसरात असलेल्या क्रांतिवीर संगोळी रायन्ना पुतळ्याची विटंबना काही समाजकंटकांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर कनकदास कॉलनी येथे भेट देऊन संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून एमटीबी नागराज यांनी वंदन केले.

यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री एमटीबी नागराज म्हणाले, संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याची पुनर्प्रतिष्ठापना करणे आवश्यक आहे. ब्रिटिशांविरोधात आंदोलनात संगोळी रायन्ना यांनी योगदान दिले असून त्यांच्या मूर्तीची विटंबना हि केवळ संगोळी रायन्ना यांचा अवमान नसून संपूर्ण देशातील जनतेचा अपमान असल्याचे ते म्हणाले.

सोमवारी विधानसभा अधिवेशनदरम्यान सर्व राजकीय पक्षांनी सुदीर्घ चर्चा केली आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सुधारणेसाठी लढलेल्या स्वातंत्र्यवीरांच्या आणि ऐतिहासिक महापुरुषांच्या असामान्य योगदानाचे आणि बलिदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले, अशी माहिती एमटीबी नागराज यांनी दिली.

समाजात तेढ निर्माण करण्यासाठी देशद्रोही कार्य करणाऱ्या समाजकंटकांवर गुंडा कायद्यांतर्गत तडीपार करण्याची शिक्षा सुनावण्यात यावी. त्याचप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधातही कायदेशीर कारवाई करण्यासंदर्भात विचार करण्यात येत असल्याचे एमटीबी नागराज यांनी सांगितले.

कोणत्याही कारणास्तव राज्यविरोधी कृत्ये होऊ देणार नाही, आणि अशी कृत्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती एमटीबी नागराज यांनी दिली.

Tags: