महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान करण्याच्या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करत आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे.

बेळगाव सुवर्णसौध येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सध्या सुरु असलेल्या मूर्ती विटंबनेसंदर्भात त्या प्रतिक्रिया देत होत्या. या घटनेमागे राजकीय हात असल्याचे सांगत समाजातील शांतता बिघडविणे, संघव्यवस्था नष्ट करणे या हेतूने हे जाणीवपूर्वक घडविले जात असल्याचे त्या म्हणाल्या. क्रांतिवीर संगोळी
रायन्ना आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श असून या महापुरुषांच्या मूर्तींची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले.
समाजातील शांतता बिघडविण्यासाठी करण्यात येणाऱ्या कृत्यासंदर्भात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कुरबर आणि मराठा समाजाच्या नेत्यांशी सौहार्दपूर्ण चर्चा करण्यात आली असून महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी आणण्यासंदर्भात कोणतीही चर्चा झाल्याचे मला माहित नसल्याची प्रतिक्रिया आमदार हेब्बाळकरांनी दिली. समाजविरोधी कृत्य करणारे सर्वजण अपराधी आणि आरोपीच असल्याचेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्र एकीकरण समिती चुकीची कृत्ये करत असून यासंदर्भात बेळगावमधील नेते मौन पाळत आहेत का? यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना हेब्बाळकर म्हणाल्या, ज्यांनी चूक केली आहे, ते चूकच आहेत. चुकीला चूक म्हणून सांगण्याचे धैर्य माझ्यात आहे, असे स्पष्टीकरण हेब्बाळकर यांनी दिले.
बेंगळूर नंतर बेळगावमध्ये झालेल्या घटनेमध्ये समाजातील शांतता बिघडविण्याचे काम करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया देत या घटनांमागे राजकीय हेतू साध्य करण्यासाठी षडयंत्र रचण्यात येत असल्याचेही आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या.


Recent Comments