बेंगळूर येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्ती विटंबनेनंतर संपूर्ण राज्यात याचे प्रतिसाद उमटत असून कर्नाटकात अनेक ठिकाणी कन्नड भाषिकांना डिवचण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी शिवसेना आणि समितीने बेळगावमध्ये तणाव निर्माण केल्याच्या आरोपातून करवे संघटनेने निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. करवे अध्यक्ष नारायणगौड यांच्या नेतृत्वाखाली हिरेबागेवाडी येथे छेडण्यात आलेल्या आंदोलनाला पोलिसांनी थांबविले.

हिरेबागेवाडी येथे करवेचे राज्याध्यक्ष नारायणगौड यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना पांगविले. सुवर्णसौधला घेराव घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलकांना पोलिसांनी आडकाठी केली. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादावादीचेही प्रकार घडल्याचे निदर्शनास आले.
बेळगाव शहरातील अनगोळ परिसरात क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कन्नड ध्वज जाळण्यात आला असून याविरोधात मराठी भाषिकांवर आरोप करत कन्नड भाषिक संघटनांनी विविध ठिकाणी आंदोलन छेडले. महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेना कार्यकर्त्यांना याबद्दल जाब विचारून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, हा आग्रह करत कन्नड रक्षण वेदिका कार्यकर्त्यांनी पदयात्रेच्या माध्यमातून आंदोलन छेडले. सुवर्णसौधला घेराव घालण्याच्या प्रयत्नात असलेल्या आंदोलकांना हिरेबागेवाडी टोलनाक्याजवळ पोलिसांनी अडविले. यावेळी पोलीस आणि करवे कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमकदेखील उडाली.
पोलिसांनी आंदोलकांना पांगविल्याने तब्बल एक तास पुणे – बेंगळूर महामार्ग रोखून धरून एक तास वाहतूक ठप्प करण्यात आली. यावेळी शिवसेना आणि समिती विरोधात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात शेकडो आंदोलकांनी सहभाग घेतला होता. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून यादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये वादावादीचेही प्रसंग घडून आले.


Recent Comments