Belagavi

विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांनी सरकार, समितीवर घेतले तोंडसुख

Share

संगोळ्ळी रायण्णा केवळ एका जाती वा समाजापुरती मर्यादित नाहीत. ब्रिटिशांविरोधात लढून प्राणांचे बलिदान दिलेले शूर देशभक्त. त्यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी विरोधी पक्षनेते सिद्दरामय्या यांनी केली.

बेळगावमधील अनगोळमधील कनकदास नगरात रायण्णा यांच्या पुतळ्याची नुकतीच समाजकंटकांनी विटंबना केली होती. त्याठिकाणी नागरिकांनी पुन्हा रायण्णा यांचा नवा पुतळा उभारला आहे. सिद्दरामय्या यांनी आज त्या ठिकाणी भेट दिली. यावेळी स्थानिकांनी त्यांचे प्रेमाने स्वागत केले. त्यानंतर सिद्दरामय्या यांनी रायण्णा यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.

त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिद्दरामय्या म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्याची मागणी होत आहे. लोकांनी या ठिकाणी तळ्याच्या काठी संगोळ्ळी रायण्णा यांचा आणखी मोठा पुतळा उभारावा. त्याचे रक्षण झाले पाहिजे. याबाबत सरकारचे लक्ष वाढणार आहे असे त्यांनी सांगितले.

कन्नड संघटनांना निदर्शने, आंदोलने करण्यास पोलीस विरोध करत असल्याच्या प्रश्नावर सिद्दरामय्या म्हणाले, निषेध व्यक्त करणे हा लोकशाहीचा भाग आहे. कोणावर अन्याय झाल्यास निषेध करण्याचा हक्क असला पाहिजे. महाराष्ट्र एकीकरण समितीला कायदा नाही अन काय नाही. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करायला हवी असे ते म्हणाले.

हातात शस्त्रे घेऊन जर कोणी पुतळ्याची विटंबना करत असेल तर कायदा व सुव्यवस्था बिघडली असा याचा अर्थ होतो. पोलिसांना कोण घाबरत नाही. गुप्तचर यंत्रणा कोलमडली आहे असा अर्थ निघतो. या सरकारच्या काळात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, गुप्तचर यंत्रणा कोलमडली आहे असा आरोप सिद्दरामय्या यांनी केला.

एकंदर अनगोळला दिलेल्या भेटीतही सिद्दरामय्या यांनी भाजप सरकार आणि महाराष्ट्र एकीकरण समितीवर तोंडसुख घेण्याची संधी सोडली नाही हेच दिसून आले.

 

 

Tags: