बेळगावातील अनगोळमधील संत कनकदास नगरात संगोळ्ळी रायण्णा पुतळ्याची विटंबना झाली होती त्या ठिकाणी रायण्णा अनगोळवासियांनी रायण्णा पुतळ्याची रविवारी पुनर्प्रतिष्ठापना केली.

राणी चन्नम्मा यांच्यासोबत ब्रिटिशांविरोधात झुंजणारे वीर सेनापती संगोळ्ळी रायण्णा यांच्या अनगोळमधील कनकदास नगरातील पुतळ्याची समाजकंटकांनी नुकतीच विटंबना केली होती. या घटनेने राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. त्यानंतर आज, रविवारी कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी विटंबना झालेला पुतळा हटवून त्याचठिकाणी क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या ६ फूट उंच नवीन पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. सुवासिनींनी जलकुंभाची मिरवणूक काढली. त्यानंतर नवीन पुतळ्याला दुग्धाभिषेक, जलाभिषेक घालून पूजा करण्यात आली. यावेळी एखाद्या उत्सवासारखे वातावरण कनकदास नगरात निर्माण झाले होते. 
या संदर्भात माहिती देताना स्थानिक रहिवासी प्रकाश पुजारी म्हणाले, अनगोळमध्ये सर्वभाषिक लोक गुण्यागोविंदाने रहात आले आहेत. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली शांततासभा घेऊन संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा पुन्हा उभारण्यात आला आहे. यापुढे कोणीही कसल्याही अफवांना थारा न देता शांतता टिकवून ठेवावी असे आवाहन त्यांनी केले.
यासंदर्भात सिद्धार्थ होसमनी म्हणाले, संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा पुन्हा उभारण्यात आल्याने आम्ही समाधानी आहोत. याबद्दल स्थानिक नागरिक आणि पोलिसांचे आभारी आहोत. पुतळा विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
एकंदर, संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा पुन्हा उभारून पुतळा विटंबनेवरून दोन समाजात पडणारी संभाव्य फूट टाळून अनगोळवासियांनी दाखवलेला शहाणपणा सामंजस्याचा म्हणावा लागेल.


Recent Comments