बेळगावात क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या निषेधार्थ पिरनवाडी ते अनगोळपर्यंत कन्नड संघटनांनी मोर्चा काढला. महापुरुषांचा असा अवमान खपवून घेणार नाही असा सज्जड इशारा निदर्शकांनी यावेळी दिला.

होय, अनगोळमधील कनकदास नगरातील संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना नुकतीच घडली होती. याच्या निषेधार्थ कन्नड संघटनांच्या निषेध मोर्चाला रविवारी सकाळी प्रारंभ झाला. प्रारंभी संगोळ्ळी रायण्णा यांच्या पुतळ्याची पूजा करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना कन्नड आंदोलक महादेव तळवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून हिंदुत्वाच्या नावाखाली महापुरुषांचा अवमान करण्यात येत आहे.
शिवाजी महाराजांप्रमाणेच संगोळ्ळी रायण्णा, राणी चन्नम्मा, मल्लम्मा हे शूर हिंदू नव्हते का? हिंदुत्ववादी संघटना खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी असतील तर त्यांनी याकडे लक्ष द्यावे. तुमच्यात ताकद असेल तर शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीला भगवा हाती धरू देऊ नका असे आव्हान त्यांनी दिले. मराठा समाज रायण्णा यांच्या अवमानावर गप्प का आहे? भगवा हाती घेऊन अशी कृत्ये केली जात असतील तर आम्हालाही भगवा नको, केवळ कन्नड ध्वज पुरेसा आहे असे पाटील म्हणाले.
https://www.facebook.com/innewsbelgaum/videos/1034277303815004
कन्नड़ समर्थक दीपक गुडगनट्टी म्हणाले, संगोळ्ळी रायण्णा यांचा अपमान होऊनही सरकार गप्प बसले आहे. पण आम्ही हातात बांगड्या भरलेल्या नाहीत. या कृत्याला आम्ही कडक प्रत्युत्तर देऊ. उद्या कर्नाटक रक्षण वेदिकेचे राज्याध्यक्ष टी. ए. नारायणगौडा यांच्या नेतृत्वाखाली सुवर्णसौधला घेराव घालून आंदोलन करण्यात येईल. सरकार जर शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालणार नसेल तर हे काम आम्ही करू असा इशारा त्यांनी दिला. यावेळी आणखी एका कार्यकर्त्याने सांगितले की, पिरनवाडीहून अनगोळपर्यंत निषेध मोर्चा काढून रायण्णा यांचा नवीन पुतळा बसवून त्याची पूजा करण्यात येईल. पुतळा विटंबना करण्याऱ्यांना तडीपार करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी मोठ्या संख्येने कन्नड आंदोलक उपस्थित होते. डीसीपी डॉ. विक्रम आमटे यांच्या नेतृत्वाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.


Recent Comments