Belagavi

‘करनाटकी’ नेत्यांप्रमाणे ईश्वरप्पाही बरळले; म्हणे म. ए. समितीचे नेते गुंडगिरी करतात 

Share

क्रांतिवीर संगोळ्ळी रायण्णा पुतळा विटंबना प्रकरणी बेळगावात २५ ते ३० जणांना अटक करण्यात आली आहे. शांतताभंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे ग्रामीण विकास पंचायत राज मंत्री के. एसईश्वरप्पा यांनी सांगितले

गदग येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री के. एस.  ईश्वरप्पा म्हणाले, महाराष्ट्रात कर्नाटकाचा ध्वज जाळल्याप्रकरणी महाराष्ट्र सरकारशी चर्चा करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत आमच्या हक्काचे पाणी, जमीन आम्ही कोणालाही देणार नाही. त्याचप्रमाणे महापुरुषांचा अवमान खपवून घेतला जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालणार का या प्रश्नावर, बंदी घालायला ती संघटना आहेच कोठे? एसडीपीआयवर बंदी घालता येईल. समितीला इतके महत्व द्यायची गरज नाही. समिती नेत्यांना आत टाकले आहे. त्यांनी पुढेही असेच केल्यास काय कारवाई करायची ती करू अशी दर्पोक्ती ईश्वरप्पा यांनी केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी आधी सगळी माहिती घेऊन बोलले पाहिजे. ते महाराष्ट्र एकीकरण समितीवाले आमचेच असे म्हणतात. यात काय अर्थ आहे? गुंडगिरी करणारे सगळे शिवकुमारांचे मित्र आहेत का असा सवाल ईश्वरप्पा यांनी केला.

एकंदर सगळ्याच ‘करनाटकी’ नेत्यांप्रमाणे ईश्वरप्पाही म. ए. समितीच्या बाबतीत असे बरळून गेले आहेत.

 

 

 

Tags: