अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सहाय्यिकांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेचा आग्रह करत बेळगावमध्ये एआयटीयूसी अंगणवाडी फेडरेशन नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात आले होते.

बेळगाव सुवर्णसौधमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सुवर्णसौधमधील सुवर्ण गार्डन येथे अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सहाय्यिकांनी धरणे आंदोलन छेडले.
महिला व बालविकास मंत्री हालप्पा आचार यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. एलकेजी, युकेजी आंगणवाडीमध्ये सुरु करण्यासंदर्भात तसेच बालसंगोपन केंद्र उघडण्यासंदर्भात केंद्र सरकारने १७० केंद्रे निश्चित केली आहेत. याला अंगणवाडी कार्यकर्त्यांचा विरोध आहे. सेवा ज्येष्ठतेवर आधारित वेतन, मृत अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना योग्य भरपाई यासह विविध मागण्यांचा आग्रह यावेळी करण्यात आला.
अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सहाय्यिकांच्या सुरु असलेल्या आंदोलन स्थळी मंत्री हालप्पा आचार यांनी भेट दिल्यानंतर त्यांचे आभार मानण्यात आले. आगामी अर्थसंकल्पात या मागण्यांच्या तरतुदीसंदर्भात विधानसभेत ठराव मांडण्यात येणार असल्याचे आश्वासन हल्लापा आचार यांनी दिले असून मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. 
यावेळी हालप्पा आचार बोलताना म्हणाले, अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सहाय्यिकांच्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात आत्मीयतेने शासनदरबारी प्रयत्न करण्यात येतील. मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करून सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सहाय्यिकांच्या हितासाठी काम करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
कानाकोपऱ्यातून शेकडो अंगणवाडी कार्यकर्त्या, आणि सहाय्यिकांनी या आंदोलनात सहभाग घेऊन आपल्या मागण्या मांडल्या. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या या आंदोलनाचा सरकार कशापद्धतीने विचार करेल, आणि अंगणवाडी कार्यकर्त्या आणि सहाय्यिकांच्या मागण्या कशा पूर्ण करण्यात येतील, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


Recent Comments