मद्यपी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा खून केला. शिवाय त्यानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील निडगुंदी गावात घडली आहे.

विजापूर जिल्ह्यातील नीडगुंदी या तालुक्यातील बेनाळ आर एस या गावात शेतात असलेल्या घरात शिवाप्पा मनगुळी नामक मद्यपी व्यक्तीने पत्नीचा खून केला आहे. सातत्याने पत्नीवर चारित्र्याचा संशय घेऊन भांडण करणाऱ्या शिवाप्पा मनगुळी हा व्यक्ती मद्यपी होता. संशयाच्या भोवऱ्यातून सुरु झालेल्या भांडणाचा शेवट खुनाने करण्यात आला तर पत्नीच्या खुनानंतर पतीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
शिवाप्पा त्याची पत्नी हणमव्वा आणि मुले रमेश आणि रवी हे कुटुंब बेनाळ आर एस या गावात शेतातील घरात राहात होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पती पत्नीमध्ये नेहमी भांडणे होत असत. नेहमीच नशेत असणाऱ्या पतीकडून पत्नीच्या चारित्र्यावरून संशय घेऊन वाद व्हायचे. खून करण्यात आला त्यादिवशी देखील याचकारणावरून दोघांमध्ये वाद झाले. या वादाचे पर्यवसन एका खुनात झाले. यावेळी दोन्ही मुले शेतावर कामासाठी गेली होती. ज्यावेळी घरी येऊन आई – वडील नसल्याचे मुलांनी पाहिले, त्यावेळी त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु यावेळी मोबाईल बंद असल्याने मुलांनी शेताकडे धाव घेतली. दरम्यान शेतातील एका झाडावर मृतदेह दिसून आले, अशी माहिती विजापूरचे एस पी एच. डी. आनंदकुमार यांनी दिली.
दोन्ही मुले सायंकाळी कामावरून परतत असत. या पती पत्नींमध्ये दररोज वाद व्हायचे. मृत शिवाप्पा ४८ वर्षांचा होता. त्याला दारूचे व्यसन होते. दररोज नशेत येऊन पत्नीच्या चारित्र्यावरून उभयतांमध्ये जोरदार वाद व्हायचे. या वादाचे पर्यवसन दोघांच्याही जीवावर बेतले अशी प्रतिक्रिया येथील स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
बऱ्याचदा संशय सत्य उघडकीस येण्याआधीच खूप घातक ठरतो. अनेकदा संशयामुळे होत्याचे नव्हते होण्यास वेळ लागत नाही, याचेच उदाहरण विजापूर मधील या घटनेवरून स्पष्ट होते.


Recent Comments