Belagavi

…तर बलात्कार एन्जॉय केला पाहिजे : रमेशकुमार यांचे वादग्रस्त विधान

Share

 स्पष्टवक्ते आणि बरेचसे फटकळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी सभापती रमेशकुमार यांनी,बलात्काराला विरोध करणे जमले नाही तर तो एन्जॉय केला पाहिजे’ असे वादग्रस्त वक्तव्य सभागृहात करून नवा वाद ओढवून घेतला आहे. त्यांच्या विधानाचा सर्वपक्षीयांकडून निषेध होत आहे.

बेळगावातील सुवर्णसौधमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेत काल सायंकाळी विधानसभेचे माजी सभापती आणि काँग्रेसचे ज्येष्ठ आ. के. आर. रमेशकुमार यांनी हे वादग्रस्त विधान केले. गुरुवारी सायंकाळी ५च्या सुमारास विधानसभेत अतिवृष्टीवर नियम ६९ अन्वये चर्चा सुरु होती. त्यावेळी आमदारांनी चर्चेला आणखी वेळ हवा अशी मागणी सभापती विश्वनाथ हेगडे-कागेरी यांच्याकडे केली. त्यावर सभापती कागेरी यांनी सायंकाळी ६ वाजेपर्यंत चर्चेला वेळ देतो असे सांगितले. ‘सगळेच बोलतो म्हणतात, सदनाचे कामकाज चालविणे माझ्यासाठी महत्वाचे आहे. आता माझी परिस्थिती कशी झाले आहे म्हणजे, लेट्स एन्जॉय द सिच्युएशन अशी झाली आहे रमेशकुमार’ असे सभापती कागेरी यांनी सांगितले.

त्यावर आपल्या नावाचा उल्लेख झाल्याचे पाहून रमेशकुमार उठून उभे राहिले आणि, बलात्काराला विरोध करणे जमले नाही तर तो एन्जॉय केला पाहिजे असे वादग्रस्त विधान केले. त्यावर सभापती कागेरी हसले. सभागृहातही हास्याचे फवारे उडाले. परंतु आता रमेशकुमार यांचे हेच विधान राज्यात टीकेचा विषय बनले आहे. या संदर्भात बोलताना माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले, रमेशकुमार अनेकदा मोठे उपदेश करतात. मात्र काळ त्यांनी महिलांबद्दल खालच्या पातळीवरील विधान केले आहे. महिलांचा त्यांनी अवमान केला आहे. त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली.

 मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, रमेशकुमार हे ज्येष्ठ आहेत. त्यांनी सभापतिपदही सांभाळले आहे. त्यांनी महिलांबद्दल असे बोलणे निषेधार्ह आहे. यातून राज्यातील महिलांना त्यांनी काय संदेश दिलाय? असा प्रश्न केला.  मंत्री मुनिरत्न म्हणाले, रमेशकुमार यांनी पुढील जन्मी स्त्री व्हावे. तेंव्हाच त्यांना स्त्रीचा कसा अवमान केला जातो याचा प्रत्यय येईल. त्यांनी एकदा साडी नेसून रस्त्यावर फिरून पहावे, तेंव्हा काही कमीजास्त झाल्यास त्यांना स्त्रियांचा त्रास समजून येईल.

मुख्यमंत्र्यांचे राजकीय सल्लागार रेणुकाचार्य यांनी, रमेशकुमार यांचे विधान काँग्रेसचे विधान असे मी समजतो.  त्यांनी आईचा अवमान केला आहे. सिद्दरामय्या यांनी त्यांना तत्काळ पक्षातून काढून टाकावं अशी मागणी केली. काँग्रेस आ. अंजली निंबाळकर म्हणाल्या, वरचेवर बलात्काराचा उल्लेख करणे आता हास्यास्पद विषय झाला आहे. खरतर हा गंभीर विषय आहे. बलात्कारामुळे सगळ्याच महिलांना दुःख होते. त्यामुळे कुणीही यापुढे सदनात सहजपणे बलात्काराचा विषय काढू नये अशी अपेक्षा व्यक्त केली.

एकंदर रमेशकुमार यांच्या वादग्रस्त विधानावर राज्यभरातून टीकेची झोड उठली आहे. लोकप्रतिनिधींना जबाबदारीने बोलायचे भान कधी येणार कोणास ठाऊक !

 

Tags: