पाकिस्तानसोबतच्या युद्धात भारताला विजय मिळवून ५० वर्षे झाल्यानिमित्त बेळगावातील मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये गुरुवारी विजय दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी युद्धातील शहीद सैनिकांना आदरांजली वाहिली.

१९७१मध्ये भारत-पाक युद्धात भारताने विजय मिळविल्याच्याघटनेला आज ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त बेळगावातील एमएलआयआरसीमध्ये आज विजय दिवस साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी बोम्मई यांच्यासह कर्नाटक व केरळ उपक्षेत्राचे जनरल कमांडिंग ऑफिसर मेजर जनरल जे. व्ही. प्रसाद, कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद, सरकारचे मुख्य सचिव पी. रवीकुमार, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून हुतात्मा योध्यांना आदरांजली वाहिली. 
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, भारत-पाक युद्धातील विजयामुळे भारत एक प्रबळ लष्करी सामर्थ्यवान देश म्हणून उदयास आला. भारतीय लष्कर देशाच्या सीमा सुरक्षित राखण्यासह अंतर्गत सुरक्षाही राखण्यातही मोलाचे योगदान देत आहे. आमच्या तिन्ही दलांच्या सैनिकांनी शौर्याने लढून १३ दिवसांत बांगला देशाची निर्मिती होण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यात पाकिस्तानचे ९० हजारहून अधिक सैनिक मारले गेले. या युद्धात आमचेही अनेक सैनिक शाहिद झाले. युद्धातील विजयामुळे सारे जग भारताकडे शक्तिशाली राष्ट्र म्हणून पाहू लागले हे आमच्या सैनिकांचे योगदान आहे. 
हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले सीडीएस जनरल बिपीन रावत आणि अन्य १३ जणांना देश नमन करतो असे सांगून मुख्यमंत्री बोम्मई पुढे म्हणाले, सेने पदक विजेत्यांच्या मानधनात सरकारने वाढ केली आहे. परमवीरचक्र आणि अशोकचक्र विजेत्यांना प्रत्येकी १.५० कोटी रुपये आणि कीर्तीचक्र, शौर्यचक्र आदी पदक तसेच सेना मेडल विजेत्यांच्या मानधनातही वाढ केली आहे.
यावेळी आ. अनिल बेनके, गृह विभागाचे सचिव रजनीश गोयल, एमएलआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडियर रोहित चौधरी, वरिष्ठ लष्करी अधिकारी, निवृत्त अधिकारी व जवान विजय दिवस कार्यक्रमाला हजर होते.


Recent Comments