Belagavi

विविध मागण्यांसाठी कर्मचारी आणि ऊस उत्पादकांचे आंदोलन

Share

अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्यांना भरपाई मिळावी, प्रति एकर कमीतकमी ३० हजार रुपये भरपाई देण्यात यावी, या मागण्या मान्य न झाल्यास याठिकाणाहून हलणार नाही, असा पवित्रा घेत शेतकरी संघाचे नंजुडस्वामी यांनी सरकारला इशारा दिला.

नरेगा योजनेंतर्गत कार्यरत असणाऱ्या विविध कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या पूर्ततेचा आग्रह करत बेळगाव सुवर्णसौध येथील गार्डनमध्ये राज्य शेतकरी संघासह इतर संघटनांच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. नरेगा योजनेंतर्गत शेतकरी महिला आणि कर्मचाऱ्यांना वर्षभर काम देण्यात यावे, ६०० रुपये कुली वेतन देण्यात यावे, यासह जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ, आरोग्य सुविधा, कर्मचारी कार्ड, ग्रामपंचायतींमध्ये होत असलेला भ्रष्टचार अशा विविध विषयांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी शेतकरी संघाचे वरिष्ठ नंजुडस्वामी बोलताना म्हणाले, २५०० कोटी रुपये भरपाई घोषित करण्यात आली पाहिजे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिएकर ३० हजार रुपये भरपाई मिळावी असा आग्रह त्यांनी केला. आम्ही या ठिकाणी भरपाई मिळविण्यासाठी आंदोलन करत असून आम्हाला सरकारची भीक नको, अशा शब्दात अनेक मागण्यांसाठी त्यांनी सरकारविरोधात रोष व्यक्त केला.

त्याचप्रमाणे शेतकरी नेत्या जयश्री गुरन्नावर बोलताना म्हणाल्या, याठिकाणी आम्ही आश्वासने ऐकण्यासाठी आपण आलो नसून नुकसान भरपाई घेतल्याशिवाय कुणीही हि जागा सोडणार नाही. मुख्यमंत्र्यांसहित १२ मंत्र्यांनी आमच्या मागण्या पूर्ण करण्याची आम्ही मागणी करत आहोत, असा आग्रह त्यांनी केला.

आज सुवर्णसौध जवळ झालेल्या या आंदोलनात शेकडो कर्मचारी, शेतकरी नेते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. सुवर्णसौधमध्ये अधिवेशन सुरु झालेल्या पहिल्या दिवसांपासूनच आंदोलकांच्या आंदोलनांना महापूर आला आहे. दिवसागणिक अनेक आंदोलक आपल्या विविध मागण्यांसाठी सुवर्णसौध परिसर गाठत असून यशस्वी सरकार म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेणाऱ्या सरकारकडून या आंदोलकांना कसा प्रतिसाद दिला जाईल, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Tags: