अपेक्षेप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचा प्रचंड बहुमतांनी विजय झाला असून अपेक्षेप्रमाणे ३०० अधिक मते काँग्रेसला मिळाली आहेत. हा विजय सर्वांच्या एकजुटीने शक्य झाला आहे, अशी प्रतिक्रिया केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली आहे.
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांनी मिळविलेल्या प्रचंड बहुमतानंतर बेळगाव काँग्रेसभवन मध्ये आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आमदार सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली. यावेळी खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकरांसह काँग्रेस नेते, कार्यकर्तेही उपस्थित होते. फटाक्यांची आतषबाजी करून विजयोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सतीश जारकीहोळी म्हणाले, या निवडणुकीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री आले, डावपेच रचले गेले. परंतु या डावपेचांनी यश आले नाही. १० दिवसांपूर्वीच या हालचाली गांभीर्याने घेणे गरजेचे होते. काँग्रेस हे बुडते जहाज असल्याचे सांगण्यात आले. परंतु काँग्रेसचा वेग नक्कीच कमी झाला आहे परंतु काँग्रेस पक्ष थांबला नाही, २०२३ च्या निवडणुकीत पक्ष संघटन अधिक होऊन पुढील निवडणुकीत काँग्रेसची सत्ता येईल असा ठाम विश्वास जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
रमेश जारकीहोळी यांना भाजप पराभूत होईल, याची खात्री होती. आणि तेच त्यांचे उद्दिष्ट्य होते. रमेश जारकीहोळी यांचे गणित कोणाला माहित नाही? मिलिटरी मधील डी-कोडिंग प्रमाणे रमेश जारकीहोळी यांनी कट रचला. भाजप उमेदवाराचा पराभव करण्याचाच त्यांनी कट रचला, अशा शब्दात रमेश जारकीहोळी यांची सतीश जारकीहोळी फिरकी घेतली.
काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्या विजयासाठी सतीश जारकीहोळी आणि काँग्रेस नेत्यांनी कंबर कसली होती. आज मिळालेल्या बहुमतानंतर विरोधकांच्या आरोपांना प्रत्त्युत्तर देण्यात आले असून आपले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याकडे काँग्रेस आगेकूच करत आहे. आगामी निवडणुका दृष्टिकोनात ठेऊन आतापासून राजकीय डावपेच रचण्यात काँग्रेस सक्रिय झाले आहे.


Recent Comments