विधान परिषद निवडणुकीत काहींनी आम्हाला पराभूत करण्याच्या उद्देशाने निवडणूक लढविली परंतु आम्ही केवळ जिंकण्यासाठी या निवडणुकीत उतरलो, अशी प्रतिक्रिया लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे.

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्या विजयानंतर लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव काँग्रेस भवनमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सतीश जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली, जिल्ह्यातील सर्व नेत्यांच्या सहकार्याने, एकसंघ होऊन आम्ही निवडणूक लढविली असून पहिल्या दिवसापासून आम्हाला या विजयाची खात्री होती, आणि निकाल सुद्धा तसेच लागले आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार हेब्बाळकर यांनी व्यक्त केली.
ही निवडणूक आम्हाला पराभूत करण्यासाठी काहींनी लढविली. परंतु काँग्रेस पक्षाचा विजय होण्यासाठीच आम्ही या निवडणूक रिंगणात उतरलो. सर्व नेत्यांचा आशीर्वाद, आजी माजी आमदार, आजी माजी मंत्री आणि सर्वांच्या कष्टाने, प्रयत्नाने आमचा विजय झाला आहे. आम्ही जनादेश जिंकला आहे. सध्या भाजपच्या विरोधात वारे वहात असून यापुढेही आमचाच विजय निश्चित असल्याचा विश्वास आमदार हेब्बाळकरांनी व्यक्त केला. (बाईट)
पहिल्याच दिवसापासून सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसकडे पुष्कळ मते असल्याचे सांगितले होते. या वोट बँकेवर लक्ष ठेवण्याची गरज असून केवळ ही मते इकडे तिकडे जाऊ नयेत, याकडे लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली होती. सर्वांनी प्रामाणिकपणे काम करत गोकाक, अरभावी याठिकाणी न जाताही आम्हाला पाठिंबा मिळाला आहे. आमचा समाज आमची साथ कधीच सोडणार नाही. जिल्ह्यातील सर्व समाजांनी, घराघरातून आम्हाला आशीर्वाद दिला असल्याची प्रतिक्रियाही आमदार हेब्बाळकर यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचे राज्याध्यक्ष डी. के. शिवकुमार, विरोधीपक्षनेते सिद्धरामय्या, सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत २०२३ च्या निवडणुकीसाठी हे निकाल टॉनिक असल्याचा टोलाही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी लगावला. यापुढेही प्रचार थांबवणार नसून पुढील निवडणुकीच्या दृष्टिकोनातून असाच प्रचार सुरु ठेवणार असल्याचे हेब्बाळकर म्हणाल्या.
चन्नराज हट्टीहोळी हे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू आहेत. आपल्या भावाच्या विजयाने लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या शक्तीत वाढ झाली असून विरोधकांना या निवडणुकीच्या आणि निकालाच्या माध्यमातून चांगलीच टक्कर देण्यात आली आहे.


Recent Comments