बेळगाव जिल्हा स्थानिक स्वराज मतदार संघातून विधान परिषदेसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी सर्वाधिक मते घेऊन विजयी झाले आहेत. तर अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी १९४५ मतांनी विजयी झाले आहेत.
होय, अतिशय चुरशीच्या ठरलेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे विध्यमान सदस्य महांतेश कवटगीमठ यांना अनपेक्षित पराभवाला तोंड द्यावे लागले आहे. काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी सर्वाधिक २६२५ मते घेऊन विजयी झाले आहेत. त्यांच्या पाठोपाठ लखन जारकीहोळी यांनी १९४५ मते घेऊन विजय मिळवला आहे. भाजपचे महांतेश कवटगीमठ याना केवळ १२०० मतांवर समाधान मानावे लागले.
चिक्कोडीतील आरडी हायस्कुलमध्ये आज, सोमवारी सकाळी ७.३० वा. मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. सर्व पक्षांच्या, उमेदवारांच्या पोलिंग एजंटच्या आणि निवडणूक अधिकाऱ्यांच्या समक्ष ५११ मतदान केंद्रातील मतपेट्या खोलून मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. काँग्रेसचे चन्नराज हट्टीहोळी प्रारंभापासूनच मतमोजणीत आघाडीवर होते. ती आघाडी त्यांनी शेवटपर्यंत टिकवून ठेवली. लखन जारकीहोळीही आधीपासूनच दुसऱ्या स्थानावर आघाडी मिळवून होते. भाजपचे विद्यमान विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आधीपासूनच पिछाडीवर होते. त्यांना शेवटपर्यंत आघाडी घेता आली नाही.
जारकीहोळी बंधूंसाठी ही विधान परिषद निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. अनपेक्षितपणे लखन यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने विविध तर्कवितर्क लढविण्यात येत होते. केपीसीसी कार्याध्यक्ष आ. सतीश जारकीहोळीयांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्यासाठी प्रचार केला होता. तर रमेश आणि भालचंद्र यांनी भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ आणि बंधू लखन यांच्यासाठी प्रचार केला होता. त्याशिवाय भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांनी निवडणूक काळात बेळगावात तळ ठोकून आपापल्या उमेदवारांचा प्रचार केला होता.


Recent Comments