येनकेन प्रकारे सीमाभागातील मराठी भाषा आणि संस्कृती चिरडण्याचा चंग बांधलेल्या कर्नाटक सरकारकडून महामेळाव्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याचा मंडप, शामियाना उखडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यातच समिती नेते दीपक दळवी यांना काळे फासण्यात आल्याने समितीने उद्या बेळगाव बंदची हाक दिली आहे.

होय, कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी दरवेळी प्रमाणे आज टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे महामेळाव्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी परवानगी देण्याच्या मागणीचा अर्ज खूप आधी करूनही प्रशासनाने सोमवारी सकाळपर्यंतही परवानगी दिली नव्हती. उलट परवानगी देण्याऐवजी महानगरपालिकेचे कर्मचारी पोलीस बंदोबस्तात व्हॅक्सिन डेपो मैदानावर पोहोचले आणि परवानगी नसताना व्यासपीठ घातले आहे, ते पाडणार आहोत असे सांगितले. त्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते व कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत जोरदार विरोध केला.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे दीपक दळवी, युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी आ. मनोहर किणेकर, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर आदींनी व्यासपीठावर चढून बसत, व्यासपीठ पाडण्याला विरोध केला.
यावेळी बोलताना माजी आ. मनोहर किणेकर यांनी, जर हे व्यासपीठ अनधिकृत असेल तर बेळगाव पालिकेसमोर स्तंभ उभारून लावलेला लालपिवळा झेंडाही अनधिकृत आहे, तो आधी हटवा, मग इथे या असे आव्हान दिले. 
यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या विरोधापुढे झुकून पालिका कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला. दरम्यान, याचवेळी काही गुंड प्रवृत्तीचा कन्नड कार्यकर्ता संपतकुमार देसाई याने दीपक दळवी यांना काळे फासले. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी कन्नड कार्यकर्त्यांना बाजूला केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी दळवी याना काळे फासल्याच्या भ्याड कृत्याचा निषेध केला. याला चोख प्रत्युत्तर देण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करत असून याकडे महाराष्ट्रातील नेत्यांचे लक्ष वेधण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
माजी आ. मनोहर किणेकर यांनी, कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांचा निषेध केला. आम्ही कोणताही शांतताभंग केलेला नाही. मात्र पाठीमागून येऊन वार करण्याचे भ्याड कृत्य केले आहे. आम्ही महाराष्ट्र व केंद्र सरकारचे याकडे लक्ष वेधू असे सांगून उद्या ‘बेळगाव बंद’ची हाक त्यांनी दिली.
दरम्यान, हा प्रकार पोलिसांचे अपयश आहे का?, व्यासपीठ काढता येत नाही तर ते उभारेपर्यंत पोलीस का गप्प बसले? असे प्रश्न पत्रकारांनी केले असता, पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन म्हणाले, काही विषय समजावून सांगण्यासाठी वेळ हवा असतो, बेळगावात आज अधिवेशन सुरु झाले आहे, त्यामुळे कोणाला बेळगाव बंदची हाक देता येणार नाही. समिती नेत्यांशी याबाबत चर्चा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.


Recent Comments