Khanapur

अंजली निंबाळकरांचा पॉलिटिकल ड्रामा : माजी आमदारांचा आरोप

Share

बेळगावमध्ये आजपासून सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनात खानापूरच्या आमदार डॉ.अंजली निंबाळकर यांनी राज्य सरकारविरोधात पदयात्रेचे आयोजन केले आहे. या पदयात्रेमागील आमदारांचा उद्देश केवळ प्रसिद्धी मिळवणे हा असून हे केवळ एक राजकीय नाटक असल्याचा आरोप माजी आमदार अरविंद पाटील यांनी केला आहे.

खानापूरमध्ये नुकतीच एक पत्रकार परिषद बोलावून माजी आमदार अरविंद पाटील यांनी आमदार अंजली निंबाळकर यांच्यावर आरोप केला आहे. गेल्या ७० वर्षात खानापूरचा विकास झाला नाही असा चुकीचा समज जनतेमध्ये पसरविण्यात येत असून जनतेची दिशाभूल करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. गेल्या अनेक वर्षात तालुक्‍यात अनेक रस्ते, पूल, शाळा-कॉलेज, समुदाय भवन, ऍम्ब्युलन्स, वीज, शैक्षणिक सुविधा यासह इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. काही जंगली भागात काही सुविधांचा अभाव वगळता तालुक्यात बरीच कामे झाली आहेत. यापूर्वी तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व आमदारांनी तालुक्याच्या विकासासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. परंतु सत्य लपविण्याचा काम आमदार अंजली निंबाळकर या करत आहेत. यासोबतच चुकीची विधानेही करत असून त्यांच्या या गोष्टीचा सर्व माजी आमदारांच्यावतीने मी निषेध करत असल्याची प्रतिक्रिया माजी आमदार अरविंद पाटील यांनी दिली.

यापूर्वी 2008 मध्ये काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदारांना उमेदवारी न दिल्याने त्यांचा पक्षाचा बंडखोर उमेदवार म्हणून पराभव झाला होता. २०१३ मध्ये उमेदवारी देऊनही जनतेने कौल दिला नाही, यावेळीही त्यांचा पराभव झाला. २०१३-१८ या कालावधीत राज्यातील सत्ताधारी पक्षात मंत्रिमंडळात पद देऊनही, त्यांचे स्वतःचे सरकार असूनही त्यांना आपला प्रभाव टाकता आला नाही. सरकारवर प्रभाव टाकून तालुक्यासाठी निधी उभारता आला असता, विकासकामे करता आली असती. त्यावेळी कोविड परिस्थितीही नव्हती. १४ महिन्यांच्या सत्ताधारी सरकारच्या काळात अनुदान मिळवून विकास साधता आला असता. बालभवनच्या अध्यक्षपदी नेमणूक झाल्यानंतर तीन वर्षे त्या या पदावर कार्यरत राहिल्या. परंतु या काळात तालुक्यासाठी त्यांनी कोणते योगदान दिले आहे? असा प्रश्नदेखील अरविंद पाटील यांनी उपस्थित केला असून याचे उत्तर जाहीरपणे आमदारांनी द्यावे, असे आव्हानदेखील दिले. .

या पदयात्रेत ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कोणतीही खबरदारी घेण्यात आली नसून, सरकारी नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे, असे आमदार अरविंद पाटील म्हणाले. शिवाय आमदार अंजली निंबाळकर यांनी राजकीय स्वार्थापोटी आणि प्रसिद्धीसाठी काढलेल्या या पदयात्रेचे उत्तर आगामी निवडणुकीत येथील जनताच त्यांना देईल, अशी प्रतिक्रियादेखील माजी आमदार अरविंद पाटील यांनी दिली आहे.

Tags: