Hukkeri

बेळगाव विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा विजय निश्चित : शानूल तहसीलदार

Share

बेळगाव विधान परिषद निवडणूक मतदान प्रक्रियेला आज सकाळी प्रारंभ झाला. परंतु दुपारी १२ वाजेपर्यंत कोणीही सदस्य मतदान केंद्रावर आढळले नाहीत. हुक्केरी तालुक्यातील ग्रामपंचायती एलीमुन्नोळी, गुडस, अम्मनगी, नेरली, बडकुंद्री या मतदान केंद्रांवर केवळ अधिकारी वर्ग आढळून आले.

विधान परिषद निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला आज सकाळी सुरुवात झाली. मतदान केंद्राबाहेर आणि आसपासच्या परिसरात काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांच्या गटागटात आपापसात जोरदार गप्पा रंगलेल्या पाहावयास मिळाल्या.

चिकोडी जिल्ह्यातील काँग्रेसचे प्रधान सचिव राजू शिदनाळ यांनी इन न्यूजशी संवाद साधला. चिकोडी लोकसभा मतदार संघातील सर्व ग्रामपंचायती, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या सदस्यांनी यावेळी काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्या बाजूने मतदान केले असून या निवडणुकीत त्यांचाच विजय निश्चित असल्याचा विश्वास शिदनाळ यांनी व्यक्त केला. तसेच आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे कार्य आणि जारकीहोळी यांचे मार्गदर्शन या गोष्टींमुळे चन्नराज हट्टीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचे ते म्हणाले.

हुक्केरी मतदार संघातील काँग्रेस अल्पसंख्यांक घटकचे अध्यक्ष शानूल तहसीलदार यावेळी बोलताना म्हणाले. गेल्या १० दिवसांपासून या भागातील सर्व सदस्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांचे अभिप्राय जाणून घेतले आहेत. अनेक वर्षांचा इतिहास हा आहे कि, काँग्रेसने जनतेसाठी अनेक विकासकामे केली आहेत. या विकासकामांना नजरेसमोर ठेऊन या निवडणुकीत चन्नराज हट्टीहोळी यांना बहुमत मिळेल. आमदार सतीश जारकीहोळी आणि माजी मंत्री ए बी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे चन्नराज हट्टीहोळी यांचा विजय निश्चित असल्याचे शानूल तहसीलदार म्हणाले.

यावेळी बेळगावमधील विनोद नाईक, राजश्री नाईक, प्रकाश नाईक, भारती धानवाडे आदींनी मतदान केंद्र स्थळी भेट दिली.

Tags: