Belagavi

विधान परिषदेसाठी उद्या मतदान; सर्व तयारी पूर्ण 

Share

जिल्ह्यातील विधान परिषदेच्या जागांसाठी उद्या होणाऱ्या निवडणुकीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. मतदान सुरळीत पार पडेल अशी माहिती जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी दिली.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी बेळगावातील ज्योती कॉलेज मतदान केंद्राला जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी निवडणूक केंद्रावर येऊन निवडणूक कर्मचाऱ्यांनी आपापले निवडणूक साहित्य संबंधित मतदान केंद्रावर नेण्याची तयारी चालवली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार म्हणाले, सर्व तालुका केंद्रांत मस्टरिंग केंद्र स्थापन केली आहेत. तेथे आज मस्टरिंग करण्यात येईल. त्याचप्रमाणे उद्या सायंकाळी मतदान संपल्यावर डीमस्टरिंग करून सर्व मतपेट्या चिक्कोडीतील आरडी हायस्कुल मतमोजणी केंद्रावर नेण्यात येतील. सर्व मतपेट्या ठेवल्यावर मध्यरात्री १२ वाजता स्ट्रॉंग रूम सील करण्यात येईल. यावेळी उमेदवारांनाही बोलावले आहे. ग्रापं, नगरपंचायत पातळीवर मतदारांना मतदान कसे करायचे याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. निरक्षर आणि दिव्यांग मतदारांना मतदानासाठी सहायक घेण्याची मुभा दिली आहे.

बेळगाव विधान परिषद मतदारसंघात एकूण ८,८७५ मतदार आहेत. चिक्कोडीत ४ डिसेंबरला सर्व उमेदवारांची बैठक घेऊन मतदान व मतमोजणी प्रक्रिया, एकेका मताचे मूल्य किती असते आदी मुद्यांवर २ तास सविस्तर मार्गदर्शन केले आहे. सर्व ५११ मतदान केंद्रांवर यावेळी प्रथमच व्हिडिओ कॅमेरे वापरण्यात येतील. त्याशिवाय सूक्ष्म निरीक्षक नेमण्यात आले आहेत. एका मतदान केंद्राला ५ याप्रमाणे एकूण ३ हजारहून अधिक निवडणूक कर्मचारी नेमण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत आमदारांना बूथ एजंट होता येत नाही. कारण त्यांना मतदान करण्यासाठी अन्य केंद्रावर जायचे असते असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

यावेळी जिप सीईओ दर्शन एच. व्ही. आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर निवडणूक कर्मचारी  निवडणूक साहित्यासह आपापल्या मतदान केंद्राकडे रवाना झाले.

 

Tags: