Belagavi

शाळांत अंडीवाटपाच्या विरोधात निदर्शने

Share

 शाळांमध्ये मुलांना अंडी वाटप करण्याच्या सरकारच्या निर्णयाला बेळगावातील काही संघटनांनी विरोध केला आहे. या निर्णयाविरोधात या संघटनांच्या सदस्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.

बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी शाकाहारी नागरिक संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शाळांमध्ये सर्व मुलांना एकच गणवेश, एकच अभ्यासक्रम लागू असताना आहाराच्या बाबतीत अंडी वाटप करून मुलांमध्ये भेद का करता? असा सवाल निदर्शकांनी केला. यावेळी बोलताना विश्वगुरू बसव मंटपाचे बसवप्रकाश स्वामीजी यांनी सरकारने शालेय आहाराच्या मुद्यावरून समाजात दुही निर्माण करण्याचा कट रचला आहे. मुख्यमंत्र्यांनी असा निर्णय घ्यायला नको होता. याआधी वीरप्पा मोईली सरकारने विरोधाची दखल घेऊन शाळांत अंडीवाटपाचा निर्णय मागे घेतला होता. त्याचप्रमाणे येडियुरप्पा-कुमारस्वामी युती सरकारनेही असा निर्णय मागे घेतला होता. बोम्मई यांनीही मंत्रिमंडळ बैठक बोलावून हा निर्णय रद्द करावा. मुले आपल्या घरी काय खातील त्याला आमचा विरोध नाही. पण शाळेत सार्वजनिक पद्धतीने मुलांमध्ये आहारावरून भेदभाव केला जाऊ नये अशी आमची मागणी आहे असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना लिंगायत नेते आनंद गुड्स म्हणाले, सरकारने शाळांमध्ये अंडीवाटपाचा निर्णय घेतला आहे तो चुकीचा आहे. याआधी अशा निर्णयाला आम्ही विरोध केल्यावर असा निर्णय मागे घेण्यात आला होता. शाळांमध्ये सर्व मुलांना एकच गणवेश, एकच अभ्यासक्रम लागू असताना आहाराच्या बाबतीत अंडी वाटप करून मुलांमध्ये भेद का करता? असा सवाल त्यांनी केला. सरकारने अंडीवाटपाचा निर्णय मागे घेतला नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी शंकर गुड्स, राजेंद्र जैन, के. बसवराज, अशोक भेंडिगेरी, नागेंद्र दास, माहेश्वरी समाजाचे भट्टड, ‘जितो’ संघटनेचे पुष्पक हनमनांवर, शिवानंद जाफरवाडी, एस. एस. पाटील, शंकर तिप्पा, बसवराज हंपन्नावर यांच्यासह जैन, ब्राह्मण समाज, राष्ट्रीय बसव दल, लिंगायत धर्म महासभा आदी समाज संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

Tags: