Belagavi

अधिवेशनात सहभागासाठी दोन्ही डोस, निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा 

Share

बेळगावात येत्या सोमवारपासून सुरु होणाऱ्या अधिवेशनात भाग घेण्यासाठी येणारे आमदार, अधिकारी आदींना लशीचे दोन्ही डोस घेतलेले असणे आणि ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट बाळगणे सक्तीचे असल्याचे जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी सांगितले

गुरुवारी बेळगावातील ज्योती कॉलेजमध्ये पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या नियमांची माहिती दिली. ते म्हणाले, वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनातील सहभागासाठी लशीचे दोन्ही डोस घेतलेले असणे सक्तीचे असल्याचे निर्देश नुकतेच आले आहेत. लस घेतल्याचे प्रमाणपत्र आणि ७२ तासांच्या आतील आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट प्रवेशासाठी दाखवणे सक्तीचे आहे. सुवर्णसौधमध्ये २ स्वाब कलेक्शन सेंटर सुरु करण्यात येतील. याबाबत आरडीपीआरला पत्र लिहिले आहे. सर्व सचिव स्तरीय अधिकारी, आमदार, विधान परिषद सदस्यांनी लशीचे २ डोस घेऊनच अधिवेशनाला आले पाहिजे. अधिवेशनास येणाऱ्या सर्वांची जेवण-निवास आदींची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक खोल्यात इ-ऑफिस सुरु केले असून सर्व फाईल्स त्याच्या माध्यमातूनच पुढे जातील असे त्यांनी सांगितले.

अधिवेशनासाठी हजारहून अधिक लोक बाहेरून येणार आहेत. त्यांची तारिहाळजवळ तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात येईल. त्यांच्या भोजन-निवासाची जबाबदारी बेळगाव पोलीस आयुक्तालयावर आहे. अधिवेशन काळात निदर्शने करणाऱ्यांना कोविड नियम पाळावे लागतील. कोणत्याही परिस्थितीत ५००हुन अधिकजणांना एकत्र जमत येणार नाही. कोविड नियमांचे उल्लन्घन होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तालयाकडे राहील. कोंडुसकोप्प आणि सुवर्ण गार्डन येथे निदर्शकांची आंदोलनासाठी व्यवस्था केली आहे असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.   यावेळी जिप सीईओ दर्शन एच. व्ही. आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

 

 

Tags: