बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील गोटूरची ग्रामदेवता महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला भक्तिभावाने प्रारंभ झाला. माजी खा. व डीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी देवीची यानिमित्त विशेष पूजा केली.

दर ५ वर्षांनी भरणाऱ्या गोटूरच्या ग्रामदेवता लक्ष्मीदेवीची यात्रा उत्साहात सुरु झाली. यानिमित्त माजी खा. व डीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी ओटी भरून विशेष पूजा करून देवीच्या गदगेकडे प्रस्थानाला चालना दिली. कलबुर्गी जिल्ह्यातील सोगुरु मठाचे चन्नराज महास्वामीजी यांच्या सानिध्यात, महाराष्ट्रातील नूल येथील सुरगेश्वर महास्वामींच्या नेतृत्वाखाली महालक्ष्मी देवीच्या नूतन मूर्तीची ओटी भरून पूजा करण्यात आली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी. खा. रमेश कत्ती म्हणाले, गोटूर गावची लहानथोर मंडळी जाती, भाषा भेद विसरून भक्तिभावाने देवीची यात्रा साजरी करत आहेत. परंपरेनुसार, सरकारचे कोविडचे सर्व नियम पाळून भक्तिभावाने ग्रामदेवतेची यात्रा साजरी करत आहेत. गेली २ वर्षे शेतकरी, गरिबांचे कोरोनामुळे जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे महालक्ष्मी देवीच्या कृपेने कोरोना आमच्या देशातून कायमचा हद्दपार व्हावा अशी प्रार्थना देवीच्या चरणी करूयात असे कत्ती यांनी सांगितले. 
यावेळी महिला भक्तांनी देवीची ओटी भरून महापूजा करून नैवैद्य अर्पण केला. त्यानंतर भंडाऱ्याच्या उधळणीत देवीची मूर्ती मिरवणुकीने हक्कदारांच्या घरी नेऊन ओटी भरण्यात आली. गावात देवी खेळविण्यात आल्यानंतर पहाटे देवीची गदगेवर प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर भक्तांनी स्वामीजींची पाद्यपूजा केली. यावेळी श्री लक्ष्मीदेवी यात्रा कमिटी आणि देवस्थान कमिटीचे पदाधिकारी, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, यात्रेनिमित्त गोटूरमध्ये ५ दिवस विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


Recent Comments