Belagavi

धनगर समाजावर जारकीहोळी बंधूंकडून अन्याय : अरविंद दळवाई यांचा गंभीर आरोप

Share

 बेळगाव जिल्ह्यातील धनगर समाजावर जारकीहोळी बंधू अन्याय करत असून त्यांना पायदळी तुडवण्याचा प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते अरविंद दळवाई यांनी केला आहे.

बुधवारी बेळगावातील कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दळवाई यांनी हा गंभीर आरोप केला. ते म्हणाले, मी धनगर समाजात जन्मलो आहे. अरभावी येथे काँग्रेसचा प्रभाव वाढू नये यासाठी भालचंद्र जारकीहोळी समाजाला पायदळी तुडवत आहेत. जारकीहोळी कुटुंबाला सिध्दरामय्यांमुळे अनेक फायदे झाले आहेत. आता सिध्दरामय्यांवरच खोटे आरोप त्यांच्याकडून केले जात असून हे अयोग्य आहे. रमेश जारकीहोळी हेही सध्या सिध्दरामय्यांवर खोटे आरोप करत आहेत. व्ही. एल. पाटील यांच्यासंदर्भात केलेली विधानेदेखील धादांत खोटी असून या सर्व गोष्टींचा मी निषेध करतो असे दळवाई म्हणाले.

काँग्रेसचा नेता असूनही विधान परिषद निवडणुकीत आपल्याला स्वतंत्रपणे काम करू दिले जात नाही, याबद्दल दळवाई यांनी नाराजी व्यक्त केली. भाजपने बहुसंख्य बूथसाठी एजंट नेमले आहेत असे अरविंद दळवाई म्हणाले. त्याचप्रमाणे सतीश जारकीहोळी यांच्याविरोधात देखील दळवाई यांनी नाराजी व्यक्त केली.

विवेकराव पाटील हे काँग्रेसशी संबंधित नाहीत, तर त्यांना काँग्रेसमधून उमेदवारी का द्यावी? असा प्रश्न देखील दळवाई यांनी उपस्थित केला. काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये जाणारे आणि विवेकराव पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी द्या असे सांगणारे रमेश जारकीहोळी कोण आहेत? असा प्रश्न देखील अरविंद दळवाई यांनी उपस्थित केला.

या पत्रकार परिषदेला रवींद्र तुप्पद, बी. पी. नायक, सलीम इनामदार, सुरेश मगदूम, इमाम हुन्नूर, दोड्डसिद्दप्पा रनहट्टी आदी उपस्थित होते.

Tags: