विजापूर -बागलकोट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिनांक १० रोजी होणाऱ्या मतदानादरम्यान मतदान केंद्रांवर होणारा गैरवापर रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची मागणी अपक्ष उमेदवार मल्लिकार्जुन लोणी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

विजापूर शहरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांना प्रथम पसंतीचे मत देण्यासंबंधी माहिती देण्यात आली. काही ठिकाणी पिडिओंच्या माध्यमातून प्रचार सुरु असल्याची माहिती आपल्याला मिळाली असून आमचे विरोधक हे सत्ताधारी पक्षांचे आणि राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार आहेत, यांच्याकडून मतदानादिवशी अधिकाराचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. यामुळे बेळगाव जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही बसविण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. निवडणूक आयोगाने यासंदर्भात तयारी करावी, असा आग्रहदेखील मल्लिकार्जुन लोणी यांनी केला. 
मल्लिकार्जुन लोणी पुढे बोलताना म्हणाले, मतदारांचे मत जाणून निवडणूक रिंगणात मी उतरलो आहे. निवडणुकीचा दृष्टिकोन ठेऊन इतर उमेदवार ग्रामपंचायत सदस्यांच्या समस्येबाबत बोलत आहेत. परंतु आतापर्यंत स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांच्या अडचणी कोणीही जाणून घेतल्या नाहीत असा आरोप करत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांनी आपल्याला प्रथम पसंतीचे मतदान करून विजयी करावे, असे आवाहन मल्लिकार्जुन लोणी यांनी केले. काँग्रेस पक्षात सामाजिक न्यायाला प्राधान्य देण्यात येत नाही. सध्या मतदार माझ्या पाठीशी उभे असून स्थानिक संघटना संघटना मजबूत करण्यासाठी काम करत आहेत. काँग्रेसमध्ये घराणेशाहीचे राजकारण करण्यात येत असून याविरोधात मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत असल्याचे मल्लिकार्जुन लोणी यांनी स्पष्ट केले. शिवाय या निवडणुकीत शंभर टक्के माझ्या विजयाची खात्री असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


Recent Comments