Belagavi

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस तोंडावर पडणार ! : मुख्यमंत्री बोम्मई

Share

विधान परिषद निवडणुकीत तोंडावर पडणार हे स्पष्ट झाल्याने काँग्रेस नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. त्यामुळे ते हताश झाले आहेत अशी बोचरी टीका मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज केली.

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावाबाहेरील एका खासगी रिसॉर्टमध्ये बेळगाव जिल्ह्यातील भाजपचे मंत्री, आमदार आणि पक्ष पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री बोम्मई यांनी काँग्रेसवर चौफेर टोलेबाजी केली. ते म्हणाले, पराभवाची खात्री झाल्याने काँग्रेस नेते हताश मनोभावनेतून काहीही बोलताना दिसत आहेत. आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची गरज नाही. बेळगाव जिल्ह्यातील, राज्यातील जनता आम्हाला प्रमाणपत्र देईल. त्रिकोणी स्पर्धेमुळे कोणाला फटका बसणार असेल तर तो काँग्रेसला. म्हणूनच तर सिद्दरामय्या, डी. के. शिवकुमार या तालुक्यातून त्या तालुक्यात धावपळ करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीन हादरल्याचे स्पष्ट होते. अशा वेळी आम्ही सर्वानी एकसंघपणे, एकमेकांवर विश्वास ठेवून कार्यरत राहिलो तर भाजपचा विजय आणि काँग्रेसचा पराभव होणार हे निश्चित आहे.

मुख्यमंत्री बोम्मई पुढे म्हणाले, विधान परिषदेवर महांतेश कवटगीमठ निवडून येणार हे सूर्य-चंद्राइतके स्पष्ट आहे. पण पहिल्या पसंतीच्या सर्वाधिक मतांनी विजयी होणे महत्वाचे आहे. त्यामुळे सर्वात तळात असलेले ग्रामपंचायत सदस्य आमच्या बाजूने अधिक आहेत हे सिद्ध होते. त्यामुळे आगामी तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक सदस्य निवडून येतील. त्यामुळे बेळगाव जिल्हा पंचायत भाजपच्या ताब्यात येऊन विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात सर्व १८ मतदार संघात भाजपचे आमदार निवडून येण्यास मदत होईल. या दृष्टीने सर्व सहकार्य देण्यास मी तयार आहे. बेळगाव जिल्ह्याच्या समग्र विकासासाठी मी वचनबद्ध आहे असे बोम्मई म्हणाले.

मेळाव्यात बोलताना केएमएफचे अध्यक्षमी अरभावीचे आमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, रमेश जारकीहोळी यांनी गेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत गोकाक मतदारसंघात भाजपला सर्वाधिक आघाडी मिळवून देत मंगल अंगडी याना विजयी करून स्वतःच्या भावाला पराभूत केले आहे. त्यामुळे येथे जमलेल्या कोणीही रमेश जारकीहोळी यांच्याबाबत शंका घेण्याची गरज नाही.

त्यानंतर बोलताना मंत्री उमेश कत्ती म्हणाले, विधान परिषद निवडणुकीत आम्ही जिंकू हे नक्की आहे. पण आगामी तालुका आणि जिल्हा पंचायत निवडणूकसुद्धा जिंकण्याकडे लक्ष दिले पाहिजे. एवढेच नाही तर २०२३ मध्ये विधानसभा निवडणूकही मुख्यमंत्री बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच जिंकून भाजप पुन्हा राज्यात सत्तेवर येईल. पण, यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहेत.

तत्पूर्वी बोलताना माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी म्हणाले, गेल्यावेळी महांतेश कवटगीमठ यांचा निसटत्या मतांनी प्रबव्ह झाला असता, परंतु कमी मताधिक्क्याने ते विजयी झाले. यावेळी तसे घडू नये, यासाठी बेळगाव जिल्ह्यातील खासदार, आमदार, मंत्री आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पहिल्या पसंतीचे मत देऊन महांतेश कवटगीमठ याना निवडून द्यावे. त्यामुळं ११ तारखेलाच या निवडणुकीचा निकाल मिळाल्यासारखे होईल.

मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, गेल्या निवडणुकीत आम्हाला ९०० ते हजार मतांचा तोटा झाला होता. यावेळी तो होऊ नये यासाठी ग्राम पंचायत आणि महिला सदस्यांनी व्यवस्थित मतदान करावे याची पुरेपूर दक्षता भाजप ग्रामीण मोर्चाच्या पदाधिकारी व सदस्यांनी घ्यावी असे आवाहन केले. तुमच्या प्रयत्नांमुळे कवटगीमठ पहिल्या फेरीतच विजयी होतील याचा मला विश्वास आहे. त्यामुळे पुढचे २ दिवस तुम्ही अथक परिश्रम घ्या असे आवाहन मंत्री जोल्ले यांनी केले.

या मेळाव्याला बेळगाव जिल्ह्यातील भाजप आमदार, नेते, पदाधिकारी उपस्थित होते. मात्र रिसॉर्टवर उपस्थित राहूनही रमेश जारकीहोळी व्यासपीठावर का आले नाहीत याचीच चर्चा मेळाव्याच्या ठिकाणी रंगली होती.

 

Tags: