बेळगाव शहर परिसरात चोरटयांचा उच्छाद वाढला आहे. पांगुळ गल्लीतील ऐतिहासिक अश्वत्थामा मंदिरासह सदाशिवनगरातील ३ दुकानात चोरटयांनी डल्ला मारला. एवढेच नव्हे तर काकती येथे ६ मोटारसायकलीही लांबविल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले.

होय, कालच गांधीनगरातील शांतीनाथ दिगंबर जैन बस्तीत पद्मावती व ज्वालामालिनी देवीच्या मूर्ती, अष्टमंगल अशा सोन्याच्या सुमारे ६ लाख रुपये किंमतीच्या मूर्ती चोरल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी रात्री पांगुळ गल्लीतील प्रसिद्ध अश्वत्थामा मंदिरातील मूर्तीचे चांदीच्या किरीटावर चोरटयांनी डल्ला मारल्याची घटना आज उघडकीस आली. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. मंदिराचा दरवाजा तोडून अश्वत्थामा देवाचा सुमारे ४ लाख रुपये किंमतीचा चांदीचा मुकूट लांबवला आहे. देवाच्या मूर्तीवरील कपडे तेथेच टाकून देण्यात आले आहेत. येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हे दृश्य चित्रित झाले आहे. 
याचप्रमाणे सदाशीनगरातील मंजुश्री पान शॉप, एक मेडिकल शॉप आणि हॉट चिप्स शॉपही फोडून चोरी करण्यात आली. आपली करामत सीसीटीव्हीत येऊ नये म्हणून चोरटयांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर तोडून टाकल्याचे दिसून आले आहे. या तिन्ही दुकानांत रोख रकमेसह ऐवजावर चोरटयांनी डल्ला मारला आहे. या संदर्भात बोलताना एका दुकानदाराने सांगितले की, दिवसेंदिवस बेळगावात चोरीच्या घटना वाढत आहेत. त्यामुळे चोरटयांनी शहरात रात्रीची गस्त वाढवण्यासह कडक उपाययोजना केल्या पाहिजेत. चोरट्यांचा त्वरित शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत.
दरम्यान, चोरीची माहिती मिळताच मार्केट पोलिसांनी पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिराला तर एपीएमसी पोलिसांनी सदाशिवनगरातील चोरी झालेल्या दुकानांना भेट देऊन पाहणी केली.
चोरटयांनी शहरासोबतच ग्रामीण भागातही चांगलाच उच्छाद मांडला आहे. सोमवारी रात्री काकती पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मॅरिएट हॉटेलसमोरील बाळू रामा चिंधी यांच्या गॅरेजसमोर लावलेल्या ५ तर जवळच्याच पौर्णिमा बारसमोर लावलेली १ अशा ६ मोटरसायकली चोरटयांनी लांबवल्या. काकतीचे मंडल पोलीस निरीक्षक गुरुनाथ, उपनिरीक्षक अविनाश यरगोप्पा यांनी भेट देऊन पाहणी केली. बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एका आठवड्याच्या आत २० हुन अधिक चोरीच्या घटना घडल्याने जनतेत भीतीचे वातावरण आहे. पोलीस आयुक्त त्यागराजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सक्त आदेश देऊन चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
अरे देवा, देवांनाही सोडेनात चोर !
काल बस्तीत आज अश्वत्थामा मंदिरात चोरी
काकतीत ६ मोटरसायकली लांबवल्या


Recent Comments