बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या खर्चाचा हिशोब करून उर्वरित रक्कमेच्या तपशिलाची कागदपत्रे माजी तहसीलदारांनी गायब केली आहेत, असा आरोप माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केला आहे.

बेळगावचे माजी तहसीलदार आणि सध्याचे दांडेली येथे कार्यरत असलेले तहसीलदार यांनी लोकसभा पोटनिवडणुकीच्या हिशोबाची कागदपत्रे हडप केली असून हा संबंधित प्रकार सध्याच्या बेळगावच्या तहसीलदारांना माहित असल्याचा आरोप माहिती हक्क कार्यकर्ते भीमाप्पा गडाद यांनी केला आहे. यासर्वांची चौकशी करून तपास करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
यासंदर्भात प्रसारमाध्यमांना माहिती देताना भीमाप्पा गडाद म्हणाले, केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या अकाली निधनामुळे बेळगावमध्ये घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीच्या खर्चासाठी प्रत्येक बूथसाठी ३० हजार रुपयेप्रमाणे ३५३ बूथसाठी एकूण १०५९०००० रुपये १२ एप्रिल २०२१ रोजी जिल्हाप्रशासनाने दिले होते. या निवडणुकीच्या खर्चाच्या तपशीलासाठी ५ जुलै रोजी बेळगावच्या तहसीलदारांना माहिती हक्कांतर्गत अर्ज देण्यात आला होता. यानंतर सदर तपशिलासंदर्भात लिखित माहिती देण्यात आली असून पोटनिवडणुकीच्या खर्चाची आणि उर्वरित रकमेच्या तपशिलाची माहिती देण्यात आली नसून सध्या दांडेली येथे कार्यरत असलेले तहसीलदार यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप भीमाप्पा गडाद यांनी केला आहे.
यानंतर बेळगावमध्ये होत असलेल्या अधिवेशनासंदर्भात प्रतिक्रिया देताना भीमाप्पा गडाद म्हणाले, बेळगावमध्ये अधिवेशन घेण्यात येत आहे, हि महत्वाची गोष्ट नसून उत्तर कर्नाटकाच्या समस्येसंदर्भात चर्चा होणे आणि समस्यांचे निराकरण होणे गरजचे असल्याचे मत गडाद यांनी व्यक्त केले. २००९ पासून झालेल्या घरांच्या पडझडींचे आणि पिकांचे नुकसान अद्याप नुकसानग्रस्तांना मिळाले नाही. ऊस उत्पादकांना त्यांची बिले वेळेत मिळत नाहीत. या सर्व गोष्टींवर अधिवेशन काळात चर्चा होणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक महिन्यात दोन दिवस मंत्रिमहोदयांनी सुवर्ण विधानसौधमध्ये हजार राहणे गरजेचे आहे. बैठक घेणे गरजचे आहे. या सर्व गोष्टींचा विचार झाल्यास उत्तम होईल, अन्यथा यापुढील काळात बेळगावमध्ये होणाऱ्या अधिवेशनावर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा भीमाप्पा गडाद यांनी दिला.
लोकसभा पोटनिवडणुकीच्या खर्चात फेरफार करण्यात आला असून घोटाळा करण्यात आल्याचा आरोप करत भीमाप्पा गडाद यांनी बेळगावचे तत्कालीन आणि सध्या दांडेली येथे कार्यरत असलेले तहसीलदार तसेच या घोटाळ्यात सामील असलेले सध्याचे बेळगावचे तहसीलदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भीमाप्पा गडाद यांनी केली आहे.


Recent Comments