Belagavi

निवडणुकीनंतर काँग्रेसला तोंड दाखविणे मुश्किल : पालकमंत्री गोविंद कारजोळ

Share

विधानपरिषद निवडणुकीत जिंकण्यासाठी काँग्रेस धडपड करत आहे. परंतु निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसला तोंड दाखविणेही मुश्किल होईल, अशा शब्दात बेळगावचे पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे.

बेळगावमध्ये रविवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. २००४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अधिकारात आलेल्या सरकारने अनेक विकासकामे केली आहेत. याचाच परिणाम म्हणून २००९ साली झालेल्या निवडणुकीत केंद्रात पुन्हा भाजप सरकार सत्तेवर आले. यापुढील काळातही भाजपाचीच सत्ता अधिकारात येईल, असा विश्वास गोविंद कारजोळ यांनी व्यक्त केला. बेळगावमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची संपूर्ण तयारी झाली असून निर्धारित तारखेलाच कोरोना मार्गसूचीनुसार अधिवेशन पार पडेल, असा ठाम विश्वास देखील त्यांनी बोलून दाखविला.

स्वातंत्र्यानंतर ७१ वर्षे काँग्रेसने जनतेला गुलामासारखी वागणूक दिली आहे. अल्पसंख्याक आणि उपेक्षित लोक काँग्रेसचे ओलीस आहेत. या परिस्थितीत आता बदल झाला असून मोदी सरकारने भारताला काँग्रेसमुक्त करण्याचा संकल्प केला आहे, असे विधानदेखील त्यांनी केले.

गोविंद कारजोळ पुढे म्हणाले, आमचे सरकार विकास कामात मागे राहिलेले नाही. पूर आला.. बरेच रस्ते,आणि घरांची पडझड झाली. गरिबांचे नुकसान झाले. यासर्व नुकसानीची भरपाई देण्यासाठी सातत्याने सरकार कार्यरत असून परिस्थिती सुधारण्यासाठी सरकार अनेक निर्णय घेत असल्याचेही कारजोळ यांनी सांगितले ,

महांतेश कवटगीमठ हे एक सज्जन राजकारणी आहेत. विधान परिषदेच्या सदस्यपदावरून त्यांनी अनेक उत्तमोत्तम कामे केली आहेत. गावांच्या सुधारणेचे काम केले आहे. त्यांच्या कार्यानुसार या निवडणुकीत त्यांचा विजय निश्चित असून काँग्रेस विनाकारण धडपड करत असल्याचे सांगत निवडणुकीनंतर काँग्रेसला तोंड दाखविणे मुश्किल होणार आहे, अशा शब्दात टोलाही लगावला.

या पत्रकार परिषदेला खासदार मंगला अंगडी, भाजप ग्रामीण जिल्हा घटक अध्यक्ष संजय पाटील, शहर घटक अध्यक्ष शशिकांत पाटील, भाजप उमेदवार महांतेश कवटगीमठ, आमदार अनिल बेनके आदींसह इतर मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: