सरकारी शाळेत मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाच्यावतीने कोट्यवधींचे अनुदान देण्यात येते. परंतु बहुतांशी सरकारी शाळा या अस्वच्छता आणि असुविधेचे आगार बनलेल्या आहेत. कित्तूर तालुक्यातील एम के हुबळी येथील सरकारी उर्दू शाळेची अवस्था तर अत्यंत भयानक झाल्याचे निदर्शनास आले आहे… पाहुयात शाळेच्या असुविधेवर प्रकाशझोत टाकणारा हा पुढील रिपोर्ट…

अबब ….! ही शाळा आहे की कचरा कुंडी?! आपल्या स्क्रीनवर दिसणारी ही सारे दृश्ये इतर कोणत्याही ठिकाणची नसून खुद्द एका सरकारी उर्दू शाळेतील आहेत…. चिखलात उभं राहून प्रार्थना करणारे विद्यार्थी…! शाळेतील दुर्गंधीयुक्त शौचालये, शाळेच्या कम्पाउंडभोवती साचलेला ढीगभर कचरा… हे दृश्य पाहून ही शाळा आहे की कचराकुंडी असा प्रश्न सहज कुणाच्याही मनात येऊन जाईल. हा सारा प्रकार आहे कित्तूर तालुक्यातील एम के हुबळी येथील सरकारी उर्दू शाळेतील अव्यवस्थेचा!… एम के हुबळी येथील या उर्दू शाळेच्या परिसरात कुत्र्यांचा आणि डुक्करांचा वावर हा सर्रास आपल्याला पाहायला मिळतो. याच परिसरातून बैलगाड्या, ट्रॅक्टर आणि ट्रॉली सुद्धा वेगाने धावतात. शाळेचा परिसर हा शाळा परिसर न दिसता एखाद्या कचराडेपोप्रमाणे भासतो. ना पिण्याच्या पाण्याची सोय ना स्वच्छता….. अशातच शौचालयाच्या माध्यमातून शाळा पूर्ण दुर्गंधीयुक्त बनली असून शाळेच्या इमारतीचीही अवस्था केविलवाणी वाटत आहे…
सध्याचा जमाना रोगराईने व्यापला असून इतक्या गलिच्छ वातावरणात विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या दुर्गंधीयुक्त वातावरणामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर हानिकारक परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असून यासंदर्भात जेडीएस जिल्हा संघटनेचे सचिव हुमायून हुनशिकट्टी यांनी आमच्या प्रतिनिधीला याबाबत विस्तृत माहिती दिली आहे. माजी आमदार डी. बी. इनामदार यांना या शाळेच्या दुरवस्थेबाबत कळविण्यात आले होते. तसेच माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा दौरा या भागात होता, त्यावेळी त्यांच्याही निदर्शनास सदर बाब आणून देण्यात आली होती. सध्याचे आमदार महांतेश दोद्गागौडर यांच्या निदर्शनास शाळेची परिस्थिती आणून देण्यात आली असून अद्याप याबाबत कोणतेही पाऊल उचलण्यात आले नसल्याचे ते म्हणाले.
याचप्रमाणे गिरीश कुलकर्णी यांनी सांगितले की, या शाळेसाठी सरकारच्यावतीने कोणतीही सुविधा मिळाली नाही. योग्य इमारत नाही, ड्रेनेजची व्यवस्था नाही. कुत्री आणि डुक्करांनी शाळेच्या परिसर गलिच्छ केला आहे. दुर्गंधीयुक्त वातावरणात विद्यार्थी शिक्षण घेत असून नगर पंचायत मुख्य अधिकारी, एसडीएमसी सदस्य, विधान परिषद सदस्य यापैकी कोणीही याची दखल घेतली नसल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला.
शाळा हे पवित्र मंदिर समजले जाते. परंतु अशा पवित्र मंदिरातच अशा प्रकारचा गलिच्छ प्रकार पाहायला मिळणे हे आपल्या देशाचे आणि शिक्षण विभागाचे दुर्दैव आहे. देशाने शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करावी, प्रत्येकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचावी यासाठी सरकार अतोनात प्रयत्न, अनेक योजना आखात असल्याचे आपल्याला जाहिरातींच्या माध्यमातून पाहायला मिळते खरे परंतु ग्राउंडलेव्हलवर येऊन पाहिलं की हा सारा प्रकार उघडकीस येतो. अपवाद वगळता अनेक सरकारी शाळांची हीच अवस्था आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे महत्व पटवून देण्याचा सरकार आटापिटा करत आहे… परंतु अशा पवित्र विद्या मंदिरातच अशा पद्धतीची अस्वच्छता असेल तर पुढे पसरणाऱ्या रोगराईला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.


Recent Comments