Vijayapura

फिल्मी स्टाईलने एटीएममध्ये चोरी : आठ दिवसात लावला पोलिसांनी छडा मुद्देबिहाळ पोलीस विभागाची कारवाई

Share

मुद्देबिहाळ परिसरातील हुडको कॉलनीत असलेल्या युनियन बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यात आल्यानंतर क्षणार्धातच काही चोरांनी एटीएम मधील तब्बल 16 लाख रुपये लांबविले आहेत. सदर चोरीदरम्यान कोणतेही सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसूनही अवघ्या आठ दिवसात या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी या बँकेच्या कॅशियर आणि एटीएमच्या सिक्युरिटी गार्डला अटक करण्यात आली आहे.

सदर चोरी प्रकरणाची तक्रार बँकेच्या मॅनेजरनी मुद्देबिहाळ पोलीस स्थानकात नोंदविली. प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना एटीएममधील सीसीटीव्ही बंद असल्याचे निदर्शनास आले होते. या चोरीचा छडा लावण्यासाठी मुद्देबिहाळ परिसरातील आसपासच्या सीसीटीव्ही चे फुटेज पडताळण्यात आले. या दरम्यान संशयास्पदरित्या या परिसरात एक स्कीफ्ट कार आणि काही व्यक्ती आढळून आल्या. तत्परतेने पुढील तपासाकडे वळालेल्या पोलिसांना या प्रकरणात बँकेचे कॅशियर आणि एटीएमची सिक्युरिटी गार्ड सहभागी असल्याचे समजले.

पोलीस चौकशीदरम्यान युनियन बँकेच्या कॅशियर मुस्मिता शराबी आणि सिक्युरिटी गार्ड विठ्ठल मंगळूर यांच्यात आपसात हा प्लॅन ठरल्याचे उघडकीस आले मुस्मिता शराबी हिचे मंजुनाथ बिण्णाळमठ या व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याचेहि चौकशीदरम्यान निदर्शनास आले. मंजुनाथ याच्या संगमनताने मुस्मिता हिने एटीएमचा पिन आणि सिक्युरिटी गार्ड विठ्ठल याच्याकडून बनावट चावी घेतल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले. यांच्या सहकार्याने मंजुनाथ याने आपल्या चार साथीदारांसह स्विफ्ट कारमध्ये हा डाव रचून एटीएमची लूट केली आहे. विजापूरचे एस पी एच डी आनंदकुमार यांनी या प्रकरणासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

या प्रकरणातील मंजूनाथचे सहकारी बसवराज, सुरेश, नागराज, मुत्तू यांच्यासह विठ्ठल आणि मुस्मिता यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडील १२ लाख रोख रुपये, एटीएम मशीन फोडण्यासाठी वापरण्यात आलेली यंत्रसामुग्री, स्विफ्ट कार, ५ स्मार्ट फोन यासह एकूण १८ लाख रुपयांच्या वस्तू हस्तगत गेल्या आहेत. या प्रकरणातील प्रमुख आरोपी मुस्मिता हिने आपल्या प्रियकरासोबत रचलेल्या या प्लानचा पर्दाफाश मुद्देबिहाळ पोलिसांनी केला आहे.

साक्षी पुराव्यांचा अभाव असूनही इतक्या कमी वेळेत आरोपींना अटक करण्यात मुद्देबिहाळ पोलिसांना यश आले असून मुद्देबिहाळ पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे कौतुक होत आहे.

Tags: