दरवर्षीप्रमाणे यंदाही गोकाक तालुक्यातील अंकलगी येथील कालिका देवी भक्तांनी पदयात्रेच्या माध्यमातून शिरसंगी येथील आदिशक्ती श्री कालिका देवीचे दर्शन घेतले.

शिरसंगी श्री कालिका देवी ही उत्तर कर्नाटकातील आदिशक्ती म्हणून प्रसिद्ध आहे. या देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पदयात्रेच्या माध्यमातून शिरसंगीकडे प्रयाण करतात. गोकाक तालुक्यातील अंकलगी येथील भक्तांनी गेल्या १७ वर्षांपासून पदयात्रेचे आयोजन करत देवीच्या दर्शनाची प्रथा सुरु केली आहे. यानुसार यंदाही अंकलगी येथील अनेक भक्तांनी पदयात्रेत सहभाग घेतला.
मंगळवारी अंकलगी पदयात्रेला प्रारंभ झाला. भक्तांनी वन्नुर मार्गे जाऊन रात्री तिनीकोळ्ळ मठात वास्तव्य केले. बुधवारी सकाळी तिनीकोळ्ळ मठापासून पुन्हा पदयात्रेला प्रारंभ केला. यरगट्टी मार्गे मुनवळ्ळी येथील श्री कालिकादेवी देवस्थानात थांबनूं शुक्रवारी सायंकाळी शिरसंगी येथे पोहोचलेल्या भक्तांनी कालिकादेवीच्या कार्तिकोत्सवात सहभाग घेतला. कार्टिकोत्सवाच्या निमित्ताने दीपोत्सवात दिव्यांनी परिसर उजळविण्यात आला होता. या पदयात्रेत भाविकांनी श्री कालकादेवीचा जयघोष करत प्रार्थना केली.
शनिवारी पहाटे पाच वाजता श्री कालिकादेवीला अभिषेक घालून महाप्रसादाचा लाभ घेतला. पुन्हा ही पदयात्रा अंकलगीच्या दिशेने परतली. रविवारी अंकलगी गावातील ग्रामदेवस्थानात कार्तिकोत्सवात सहभागी होऊन पदयात्रेची सांगता झाली.


Recent Comments