Belagavi

छत्रपती शिवरायांना दीपोत्सवातून अभिवादन

Share

हिंदवी स्वराज्याची स्थापना करून रयतेच्या जीवनात खऱ्या अर्थाने प्रकाश आणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना बेळगावात शिवप्रेमींनी अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. शहापूरातील शिवाजी उद्यानात शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्यासमोर शेकडो दीप प्रज्वलित करून कार्तिकोत्सव साजरा करण्यात आला

एकाहून एक सुबक-सुंदर रांगोळ्या, दिवे आणि मशालींच्या प्रकाशात उजळून गेलेला परिसर आणि त्याला आकाशातील टिपूर चांदण्याची साथ, होय, हे दृश्य आहे बेळगावातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानातील. कार्तिक मासानिमित्त काल, रविवारी सायंकाळी असंख्य शिवप्रेमींनी भव्य कार्तिकोत्सव साजरा केला.

उद्यानाच्या फाटकापासून ते शिवरायांच्या पुतळ्यापर्यंत भव्य रांगोळी रेखाटण्यात आली होती. त्यासोबतच रांगोळीच्या आजूबाजूने असंख्य दिवे लावण्यात आले होते. रयतेच्या जीवनात प्रकाश आणणाऱ्या रयतेच्या राजाला या उपक्रमाद्वारे अनोखे अभिवादन करण्यात आले. त्यामुळे शिवाजी उद्यानात प्रकाशाचे पर्व साकारले.

दीपोत्सवानंतर उद्यानात शिवाजी महाराजांची आरती, पोवाडे व अन्य कार्यक्रम झाले. दर रविवारी असेच प्रकाशपर्व साजरे करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला.

 

Tags: