कोविड संकट काळात नेमलेल्या हंगामी सुश्रुषा कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीचे निवेदन खानापूर तालुक्यातील कोविड वॉरियर्स सुश्रुषा कर्मचाऱ्यांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

कोविड संकट काळात कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण खात्याने ३ ते ६ महिन्यांच्या काळासाठी हंगामी कंत्राटी तत्वावर सुश्रुषा कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. या सुश्रुषा कर्मचाऱ्यांनी खानापूर तालुक्यात गावोगावी कोविडच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा केली आहे. आता सरकार या कर्मचाऱ्यांना मुक्त करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसे न करता आम्हाला सेवेत कायम करा अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 
यासंदर्भात माहिती देताना कोविड वॉरियर्स सुश्रुषा कर्मचाऱ्यांनी सांगितले की, आम्हाला ३ महिन्यांसाठी नेले होते. आता कोविड प्रकरणे पुन्हा जास्त संख्येने आढळून आल्यामुळे आमची सेवा पुढेही सुरु ठेवली होती, आता आम्हाला सेवेतून मुक्त करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत आम्ही यापूर्वी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ याना निवेदन दिले होते. त्यांनी आम्हाला ‘एनएचएम’ आणि ‘एनसीडी’ पदांच्या भरतीत प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप जिल्हा प्रशासनाकडून कसलाही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता पुन्हा जिल्हाधिकारी व्यंकटेशकुमार याना निवेदन दिले आहे. यावेळी खानापूर तालुक्यातील कोविड वॉरियर्स सुश्रुषा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments