विधानपरिषद निवडणूक प्रक्रिया दोषविरहित पार पाडावी, निवडणुकीदरम्यान मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत कोणतीही चूक होणार नाही याची दक्षता अधिकाऱ्यांनी घ्यावी, असा इशारा बेळगाव जिल्हा विधानसभा निवडणूक निरीक्षक, वरिष्ठ आयएएस अधिकारी एकरूप कौर यांनी दिला आहे.

शुक्रवारी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विधानपरिषद निवडणुकीसंदर्भात नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करून मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. विधान परिषद निवडणुकीत पसंतीने मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येत असल्यामुळे या निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया थोडी वेगळी आहे. यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. निवडणुकीच्या कामासाठी नेमलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचना वरिष्ठ आयएएस अधिकारी एकरूप कौर यांनी दिल्या.
यावेळी प्रशिक्षण नोडल अधिकारी प्रीतम नसलापुरे यांनी निवडणुकीच्या तयारीबद्दल माहिती दिली.
या बैठकीला जिल्हा माहिती अधिकारी आणि निवडणूक अधिकारी आर वेंकटेशकुमार, शहर पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जिल्हा पंचायत सीईओ दर्शन एच. व्ही., एस. पी. लक्ष्मण निंबरगी, अपर जिल्हाधिकारी डॉ. शंकराप्पा वणक्याळ, मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, बेळगाव एसी रवींद्र करलिंगण्णावर, प्रशिक्षण नोडल अधिकारी प्रीतम नसलापुरे, कृषी विभागाचे सहाय्यक संचालक शिवनगौडा पाटील, माहिती विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर, एन.आय.सी. अधिकारी यांच्यासह सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
निवडणूक निरीक्षक एकरूप कौर यांनी बैठकीनंतर काकती व कडोली गावांना भेट देऊन बूथची पाहणी केली. दोन्ही ग्रामपंचायत इमारतीत उभारण्यात आलेल्या बूथचे त्यांनी निरीक्षण केले. तसेच मार्गदर्शक तत्त्वांनुसार पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली. यावेळी बेळगाव एसी रवींद्र करलिंगण्णावर, प्रशिक्षण नोडल अधिकारी प्रीतम नसलापुरे, मागासवर्गीय कल्याण विभागाचे जिल्हा अधिकारी गौरीशंकर, तहसीलदार कुलकर्णी आदी उपस्थित होते.


Recent Comments