एका कार्यक्रमात जेवल्यावर एकाच कुटुंबातील सहा मुलांसह ११ जणांना विषबाधा झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील बंकी गावात घडली आहे.

होय, खानापूर तालुक्यातील बेकवाड ग्राम पंचायतीच्या हद्दीतील बंकी गावातील जमादार कुटुंबातील ११ सदस्यांना अन्नातून विषबाधा झाल्याने ते अत्यवस्थ झाले. या सगळ्यांना एका कार्यक्रमात जेवल्यानंतर उलटी-जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यांच्यावर नंदगड प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात येत आहेत. जमादार कुटुंबातील सर्व सदस्य मंगळवारी दुपारी एम. के. हुबळी येथे एका कार्यक्रमाला गेले होते. तेथे जेवण करून रात्री बंकी गावातील आपल्या घरी परतले. त्यानंतर या सर्वाना उलटी-जुलाबाच्या त्रास सुरु झाल्याने नंदगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. 
अत्यवस्थ झालेल्यांमध्ये ७० वर्षीय अब्दुल समद जमादार, ५६ वर्षीय नमाजबी जमादार, ४० वर्षीय महंमद जमादार, ३५ वर्षीय सरताज जमादार, ३२वर्षीय शहनाज जमादार, १४ वर्षीय साहिर जमादार, १२ वर्षीय सिमरन जमादार, १२ वर्षीय तुषार जमादार, ८ वर्षीय सहना जमादार, १० वर्षीय अल्फीया जमादार, ४ वर्षीय अजान जमादार यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच खानापूर तालुका आरोग्याधिकारी डॉ. संजय नांद्रे यांनी नंदगड आरोग्य केंद्राला भेट देऊन जमादार कुटुंबीयांची विचारपूस केली. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती सुधारत आहे. डॉ. अर्चना माळगी, मुख्य वैद्याधिकारी डॉ. यल्लनगौडा पाटील, डॉ. राजश्री बड्सगोळ, डॉ. भूषण लहान मुलांची वरचेवर तपासणी करून उपचार करत आहेत.


Recent Comments