अवकाळी पावसामुळे बसलेल्या तडाख्यामुळे बंगळूरमध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे झालेल्या नुकसानीची आणि परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेंगळूरमधील केआरपुरम विधानसभा मतदार संघाच्या व्याप्तीत येणाऱ्या विविध परिसरांना भेट दिली.

मुसळधार पावसामुळे बेंगळूर मधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळूरमध्ये ‘सिटी राउंड’ केला.
बुधवारी केआर पुरम विधानसभा मतदार संघात येणाऱ्या शिरडी साई कॉलनीला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. तसेच चेन्नूर येथील मुख्य मार्गावरील पटेल मुनिशमप्पा कॉलनीत पावसामुळे उद्भवलेल्या समस्यांसंदर्भात नागरिकांशी चर्चा करून या कॉलनीमधील समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर राजकालवा, शिर्डी साईबाबा लेआऊट ला भेट दिली. यावेळी स्थानिक आमदार भैरती बसवराज उपस्थित होते. राजकालव्याचा नकाशा पाहून अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. नाल्यामध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा झाला नाही. यामुळे घरातून पाणी शिरल्याचा प्रकार झाला आहे. या समस्येवर कायमचा तोडगा काढण्याची विनंती नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राजकालव्याच्या समस्या अधिक झाल्या असून यासंदर्भात नागरिकांनी आणि आमदार भैरती बसवराज यांनी अडचणी आणि समस्या माझ्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. यलहंक कालवा, हेब्बाळ कालवा, केआर पुरम कालव्यामध्ये अतिवृष्टीमुळे पाण्याचा ओघ वाढला आहे. यामुळे आसपासच्या परिसरात पाणी शिरले आहे. यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करून महसूल मंत्री आर. अशोक यांच्या निदर्शनास सदर बाब आणून देऊन पीक आणि मालमत्तेचे नुकसान भरून काढण्यासाठी जलद उपाययोजना आखण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात बेंगळूरमधील अनेक भागात पाणी शिरले आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले असून बेंगळूरमधील अनेक भागांना मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली आहे.


Recent Comments