बेळगावमध्ये सुवर्ण विधानसौधसमोर १३ ते २४ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आंदोलने आणि निवेदने देणाऱ्या संघटनांनी पोलीस आयुक्तालय कचेरीतुन परवानगी घेणे आवश्यक असल्याची माहिती डीसीपी विक्रम आमटे यांनी दिली.

बुधवारी बेळगावमध्ये आपल्या कार्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलताना डीसीपी विक्रम आमटे यांनी सदर माहिती दिली. हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीत आंदोलने करण्यासाठी, निवेदन देणाऱ्या संघटनांच्या अध्यक्षांनी , प्रमुखांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि ईमेल आवर्जून नोंद करणे आवश्यक आहे. आंदोलन करण्यासाठी शहर पोलीस आयुक्तांकडे अर्ज देऊन मागणी करणाऱ्या आंदोलकांसाठी सुवर्ण विधानसौध शेजारी असलेल्या सुवर्ण गार्डनमध्ये उभारण्यात आलेल्या तंबूत जागा देण्यात येईल. तसेच कोंडुस्कोपमध्ये उभारण्यात आलेल्या तंबूमध्ये जागा देण्यात येईल. तसेच पोलीस आयुक्तालयाकडून आंदोलनासाठी तारीख नेमून देण्यात येईल, असेही डीसीपींनी स्पष्ट केले.
शहर पोलीस आयुक्तालयाची परवानगी न घेतल्यास कोणतेही आंदोलन, निवेदन सादर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. तसेच धरणे आंदोलन, उपोषण, रॅली यासाठीही परवानगी देण्यात येणार नसल्याची कडक सूचना डीसीपींनी दिली आहे. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे विभाग, बेळगाव शहर दूरध्वनी क्रमांक ०८३१-२४७१५७७, मोबाईल क्रमांक ९४८०८०४१०९, पोलीस इन्स्पेक्टर सीसीआरबी विभाग मोबाईल क्रमांक ९४४८१८५८३७, पोलीस कंट्रोल रूम ०८३१-२४०५२३३, २४५२१३१ या क्रमांकावर अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बेळगावमध्ये दोन वर्षानंतर भरणाऱ्या या अधिवेशनासाठी सर्व तयारी करण्यात आली असून अधिवेशनादरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये, याची खबरदारी घेऊन पोलीस विभागातर्फे परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे. अधिवेशनादरम्यान सभागृहातील गोंधळ कमी होण्याची शाश्वती जरी नसली तरी विधानसभेसमोरील होणारा आंदोलकांचा गोंधळ कमी होण्याची शक्यता जाणवत आहे.


Recent Comments